ना कोणाचा फोन…, ना मेसेज… तरीही मोबाईल खणखणतो तेव्हा.. | पुढारी

ना कोणाचा फोन..., ना मेसेज... तरीही मोबाईल खणखणतो तेव्हा..

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : ना कोणाचा फोन आला.. ना कोणाचा मेसेज… ना आलार्म लावला तरीही मोबाईल खणखणू लागला. सकाळी सकाळी दहा वाजून वीस मिनिटांनी एकाच वेळी अनेकांचे मोबाईल टॉर्च व व्हायब्रेशनसह मोबाईल रिंग वाजू लागल्याने नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला. मोबाईल पाहिला तर स्क्रीनवर मेसेज होता. काळजी करण्याची गरज नाही. सध्या कोणताही धोका आलेला नसून, ही केवळ एक चाचणी आहे.

भारतीय दूरसंचार विभागाकडून आपत्तीच्या काळात शासकीय यंत्रणेने सतर्क राहावे म्हणून इमर्जन्सी अलर्ट केला जातो. 10 एप्रिल 2023 रोजी केंद्र सरकारने अधिसूचना तयार करून सर्व मोबाईल उत्पादक कंपन्यांना इमर्जन्सी अलर्टचे सर्व वैशिष्ट्य असणारे अ‍ॅप मोबाईलमध्ये बसवण्यास सांगितले आहे. तत्पूर्वी सध्या असणार्‍या स्मार्ट फोनवर गुरुवारी सकाळी दहा वाजून वीस मिनिटांनी या इमर्जन्सी अलर्टची चाचणी झाली.

या चाचणीची कोणतीही पूर्व कल्पना नव्हती. सर्वच नाही, पण काही स्मार्टफोनवर हे मेसेज आले. घरात एकाच वेळी मोबईलचे अलार्म टॉर्च लाईट लागल्याने अनेकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. काहींनी मोबईल स्क्रीन पाहिली त्यावर इंग्रजीमध्ये मेसेज आला. नंतर 10 वाजून 31 मिनिटांनी मराठीमध्ये मेसेज आला. यात म्हटले होते. ‘हा भारत सरकारच्या दूरसंचार विभागाकडून एक चाचणी इशारा आहे. पुढे दिनांक आणि वेळ होती.

हा संदेश वाचून नेमकी कोणती चाचणी व कशाचा इशारा हे अनेकांना समजत नव्हते. हा संदेश आपल्याच मोबाईलवर आला आहे की इतरांनाही आला आहे. मोबाईल अचानक का वाजला, अनेकांनी तत्काळ सोशल मीडियावर हा संदेश फॉरवर्ड करून त्याची शहानिशा करण्यास सुरुवात केली.

…अन् नागरिकांनी सोडला सुटकेचा निःश्वास!

सोशल मीडियावरही अनेकांच्या तर्क-वितर्काला उधाण आले होते. कोण महापूर येणार म्हणून हा अलर्ट दिल्याचे सांगितले. तर कोणी भूकंप होणार असल्याचे सांगितले, पण नंतर पुन्हा मेसेज आला सध्याचा अलर्ट आपत्ती काळात देण्यात येणारी सूचना होती. ही केवळ चाचणी आहे, सध्या कोणताही धोका नसून नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. या संदेशानंतर नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

Back to top button