कोल्हापूर : तापाच्या पाच रुग्णांपैकी एक डेंग्यू संशयित | पुढारी

कोल्हापूर : तापाच्या पाच रुग्णांपैकी एक डेंग्यू संशयित

कोल्हापूर : संतोष पाटील

कोल्हापूर शहरात डेंग्यूसद़ृश तापाच्या रुग्णांची संख्या कमी होत नसल्याचे चित्र आहे. सर्वसाधारण तापाच्या पाच रुग्णांपैकी एक डेंग्यूसद़ृश आजार असल्याचे तपासणीत निष्पन्न होत आहे. शासकीय आकडा मात्र महिन्याला शंभरपेक्षाही कमी असल्याने यंत्रणा सुस्त आहे. कोल्हापूर  महापालिकेने व्यापक स्वरूपात आरोग्य आणि जनजागृती मोहीम हाती घेण्याची गरज आहे.

दमदार पावसाच्या जोडीला कडकडीत ऊन, रात्रीचे थंड वातावरण हे डेंग्यूस कारणीभूत असलेल्या प्रामुख्याने गोड्या पाण्यात पैदास होणार्‍या एडीस डासांच्या उत्पत्तीस पोषक वातावरण आहे. सप्टेंबर-ऑक्टोबर या ऋतुसंक्रमणाच्या काळात डासांच डंख नागरिकांच्या जीवावर उठत आहे. डेंग्यूसह साथीच्या रोगांना अटकाव करण्यास महापालिकेसह जिल्हा आरोग्य यंत्रणेला अपयश आल्याचे वास्तव आहे. कोरोना संसर्गातून सुटका होताना दिसत असली, तरी जानेवारी महिन्यापासून डेंग्यूचे रुग्ण सातत्याने आढळत आहेत.

महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या घर टू घर सर्वेक्षणात सातत्य नाही. आजारी व्यक्तीची माहिती, आजारी असल्यास कारणे, डेंग्यूसद़ृश लक्षणे आढळल्यास शासनाकडून औषध उपचार, डेंग्यूबाबत प्रबोधन आदी उपक्रम राबवले जात नसल्याची नागरिकांची तक्रार आहे. डेंग्यू आटोक्यात आल्याचा दावा केला जात असला, तरी मागील तीन महिन्यांत रुग्णांची संख्या झपाट्याने वाढल्याचे वास्तव आहे.

सर्वसामान्य आजार?

महापालिका यंत्रणेने खासगी रुग्णालयांना डेंग्यू रुग्णांबाबत माहिती देण्याच्या सूचना केल्या आहेत; मात्र रुग्णसंख्या इतकी मोठी आहे की, किती रुग्णांची माहिती द्यायची, असा हतबल प्रतिसवाल एका वैद्यकीय तज्ज्ञाने केला. डेंग्यू हा सर्वसामान्य आजार होऊ लागला आहे. महापालिका तसेच लोकप्रतिनिधी या गंभीर आजारावर उपाययोजना करण्याबाबत सपशेल दुर्लक्ष करत असल्याने तीव— नापसंती नागरिकांतून व्यक्त होत आहे.

बेफिकिरी भोवतेय..!

घरातील एकास डेंग्यूसद़ृश आजार झाल्यास उपचारासाठी किमान साठ हजार रुपयांपेक्षा अधिक खर्च खासगी दवाखान्यात येतो. शासकीय आकडेवारीनुसार मागील चार महिन्यांत सरासरी 70 ते 90 रुग्ण सापडत असले, तरी प्रत्यक्षात हा आकडा कितीतरी पटीने अधिक आहे. उपनगरासह सर्वच शहरात डेंग्यूचे रुग्ण आढळत असून महापालिकेने सातत्यपूर्ण आणि ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे. फॉगिंग मशिन आणि महिन्यातून कधीतरी डास प्रतिबंधक औषध फवारणी या तोकड्या उपायोजनामुळे डेंग्यू आटोक्यात येणार नसल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. घरात किंवा घराभोवती गोड्या पाण्याचे साठे होणार नाहीत, याकडे लक्ष द्यावे. डेंग्यूवर प्रतिबंध हाच उपाय असल्याने नागरिकांनी सजग राहण्याची गरज आहे.

‘पुढारी’च्या दणक्यानंतर मनपा प्रशासन हडबडून जागे

कोल्हापूर शहरात डेंग्यू व चिकनगुनिया आजाराने थैमान घातल्याचे वृत्त दै. ‘पुढारी’त गुरुवारी प्रसिद्ध झाल्यानंतर महापालिका प्रशासन हडबडून जागे झाले. डासांचे साम—ाज्य निर्माण झाले असूनही महापालिका प्रशासन झोपले आहे का, असे वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते. त्यानंतर शहरात डेंग्यू व चिकनगुनिया आजाराचे सर्वेक्षण गतिमान करण्यात आले. दिवसभरात तब्बल 287 ठिकाणी डेंग्यू डासांच्या अळ्या सापडल्या. महापालिका कर्मचार्‍यांनी त्या अळ्या नष्ट केल्या.

दरम्यान, नागाळा पार्कमध्ये बांधकाम व्यावसायिक पत्की यांनी इमारतीच्या खोदाईसाठी काढलेला खड्डा गेली तीन वर्षे तसाच आहे. त्यात पाणी साठून डेंग्यू डासांच्या अळ्यांची उत्पत्ती होत असल्याने परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या ठिकाणी महापालिकेच्या नगररचना विभागाचे व आरोग्य विभागाच्या अधिकार्‍यांनी पाहणी केली. नगररचना विभागाने पत्की यांना तुमचा बांधकाम परवाना रद्द का करू नये, अशी नोटीस गुरुवारी बजावली. आरोग्य विभागाच्या वतीनेही पत्की यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली.

Back to top button