विशाळगड : निसर्गाचा हिरवा गर्द आविष्कार | पुढारी

विशाळगड : निसर्गाचा हिरवा गर्द आविष्कार

विशाळगड : सुभाष पाटील- हिरवीगार झाडी, निसर्ग सौंदर्याची मुक्त उधळण, आकाशाची स्पर्धा करणाऱ्या दऱ्या, अंगावर रोमांच उभा करणारा खट्याळ वारा, हिरवा शालू परिधान करून पावसाच्या वर्षावात चिंब-चिंब भिजणारा निसर्ग असे विहंगम दृश्य विशाळगडाचे. निसर्गाचा नयनरम्य आविष्कार पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी वाढली आहे.

विशाळगडाचे विहंगम दृश्य पर्यटकांना आकर्षित करत आहे.

विशाळगड ऐतिहासिक व धार्मिक स्थळ आहे. परिसरात संततधार पर्जन्यवृष्टीमुळे पावसाचे न्यारे रूप पाहावयास मिळत आहे. धुक्याची पांघरलेली शाल, खळखळणारे धबधबे या सर्वांचा मनमुराद आनंद लुटणारी तरूणाई चिंब-चिंब होऊन बागडताना दिसत आहे. डोंगररांगानी हिरवा शालू परिधान केला आहे. वाराही सुसाट वेगाने बेधुंदपणे वाहू लागला आहे. गड परिसरात नानाविध जातीची,  रंगाची आकर्षक फुले आणि फुलांचे सडे पहायला मिळत आहेत. सोबतच अनेक जातीचे पक्षी, फुलपाखरे व वन्यजीवांचे दर्शन पर्यटकांना आकर्षित करत आहे.

निसर्गाचा हा ‘वन्स मोअर’ पर्यटकांच्या स्वागतासाठी सज्ज आहे. सप्तरंगी इंद्रधनुष्य, हिरवा निसर्ग, पावसाच्या सरी, सोबतच शंभर टक्के फ्री ऑक्सिजन अनुभवायला मिळतो. निसर्गाचा हा अविष्कार पाहण्यासाठी कोणत्याही प्रकारचे ना तिकीट, ना नियम, निकष, निर्बंध, पूर्णपणे मोफत. निसर्गप्रेमींना परिसर खुणावत आहे. मुंढा दरवाजा, बाजीप्रभू, फुलाजीप्रभू समाधी, टकमक दरी येथे गर्दी होऊ लागली आहे. निसर्गाच्या जादुई कुंचल्याची किमया व  विहंगम दृश्य कॅमेऱ्यात, मोबाईलमध्ये टिपण्यासाठी तरुणाई सरसावली आहे. कोसळणारे धबधबे, धुक्याचे लोट, सेल्फी पॉईंट पर्यटकांना मोहित करत आहेत.

मुंढा दरवाजा

गडावर काय पाहाल

बाजीप्रभू, फुलाजीप्रभु देशपांडे समाधी, मुंढा दरवाजा, रणमंडळ टेकडी, अमृतेश्वर महादेव मंदिर, सती वृंदावन, पंतप्रतिनिधी वाडा, मारुतीटेक मंदिर, राममंदिर, नृसिंह मंदिर, मलिक रेहान दर्गा यासह अन्य ३३ वास्तूसह खोल दऱ्या, विशाळगडाचे बदललेलं रूप, निसर्गसौदर्य, गेळवडे जलाशय आदी.

मलकापूर-विशाळगड : ३५ किमी

कोल्हापूर-विशाळगड : ८० किमी

आंबा-विशाळगड : १८ किमी

Back to top button