काळम्मावाडी धरणाचे पाणी जॅकवेलमध्ये | पुढारी

काळम्मावाडी धरणाचे पाणी जॅकवेलमध्ये

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : काळम्मावाडी धरणातील पाणी गुरुवारी मध्यरात्री थेट पाईपलाईनसाठी असलेल्या जॅकवेलमध्ये आले. धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने पाणी पातळीत वाढ झाली आहे. फोडलेल्या कॉपर डॅमच्या ठिकाणाहून पाणी इंटेकवेलमध्ये आले. तेथून इन्स्पेक्शन वेल क्र. 1 व 2 मध्ये आल्यानंतर ते पाणी जॅकवेलमध्ये पोहोचले. कोल्हापूर शहरासाठी साकारलेल्या थेट पाईपलाईन योजनेत पहिल्यांदाच धरणाचे पाणी आले आहे.

थेट पाईपलाईनसाठी जॅकवेलपासून सुमारे 250 मीटर अंतरावर काळम्मावाडी धरण क्षेत्रात इंटेकवेल बांधली आहे. धरणातील पाणी पातळी 610 मीटरपर्यंत खालावली तरीही कोल्हापूरसाठी पाण्याचा उपसा करता येणार आहे, परंतु यंदा त्यापेक्षा कमी म्हणजे 609 मीटरपर्यंत पाणी पातळी कमी झाली. गेल्या काही दिवसांत धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे धरणातील पाणी साठ्यात हळूहळू वाढ होत आहे. शुक्रवारी सायंकाळी धरणातील पाणी पातळी 614 मीटर इतकी होती.

इंटेकवेल सुमारे 30 फूट खोल आणि 14 फूट रुंद आहे. इंटेकवेल ते इन्स्पेक्शन वेल क्र. 1 हे अंतर 72 मीटर असून 1800 मि. मी. व्यासाच्या पाईपलाईनने जोडण्यात आले आहे. इन्स्पेक्शन वेल क्र. 1 ते क्र. 2 हे अंतर 91 मीटर लांबीचे असून 1800 मि. मी. व्यासाची पाईपलाईन आहे. दोन्ही इन्स्पेक्शन वेलच्या पाईललाईन जॅकवेल क्र. 1 व जॅकवेल क्र. 2 ला दोन वेगवेगळ्या पाईपलाईनने जोडल्या आहेत. हे अंतर सुमारे 87 मीटर इतके आहे. 14 मि. मी. व्यासाच्या पाईपलाईन जॅकवेलपर्यंत टाकल्या आहेत. या जुळ्या जॅकवेलची खोली 150 फूट असून रुंदी 40 फूट आहे. दोन्ही जॅकवेल स्लॅब टाकून त्यावर पंपहाऊस केले आहे. 940 एच. पी. चे चार पंप बसविण्यात येत आहेत. त्यातील तीन पंप कार्यरत राहणार असून एक स्टँडबायसाठी आहे. या टाक्यातील पाणी उपसा करून ते कोल्हापूर शहराला पुरविण्यात येणार आहे.

Back to top button