कोल्‍हापूर : जिल्ह्याचा पालक म्हणून भूमिका निभावणार : हसन मुश्रीफ | पुढारी

कोल्‍हापूर : जिल्ह्याचा पालक म्हणून भूमिका निभावणार : हसन मुश्रीफ

कागल, पुढारी वृत्तसेवा : मी ‘ईडी’च्या धाकामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये गेलो नाही. गेली आठ-नऊ महिने या प्रसंगाशी मी धैर्याने आणि धाडसाने मुकाबला करीत आहे. न्यायालयाने सातत्याने आम्हाला दिलासा दिला आहे. शरद पवार हे आमचे दैवत आहेत. आमचे विठ्ठल आहेत. विठ्ठलाला जशा पालख्या जातात तशीच आमची एक पालखी पताका विठ्ठलाकडे जाणारी आहे. काही मत, मतांतरे आहेत, मात्र इतर गोष्टीवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन राज्याचे कॅबिनेट मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. आता सर्व घटक पक्षांना भक्कम करूया. सर्वांना योग्य न्याय देऊया. वयाने ज्येष्ठ असल्याने जबाबदारीने पालकाची भूमिका पार पाडेन, असेही त्यांनी स्पष्ट केले.

राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये कॅबिनेट मंत्री झाल्यानंतर मुश्रीफ यांचे कागलमध्ये शुक्रवारी प्रथमच आगमन झाले. येथील गैबी चौकामध्ये त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला. याप्रसंगी ना. मुश्रीफ बोलत होते. शहरात आगमन झाल्यानंतर मुश्रीफ यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन केले. यावेळी मुश्रीफ यांच्या विजयाच्या घोषणांनी संपूर्ण चौक दणाणून गेला. प्रमुख मार्गावरून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. फटाक्यांची आतषबाजी करून कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला.

ना. मुश्रीफ म्हणाले, शरद पवार यांनी राष्ट्रवादी पक्षाची स्थापना केली आणि अचानक असे काय घडले की शिंदे-फडणवीस यांच्या सरकारमध्ये आम्हाला सामील व्हावे लागले? याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या सर्व घडामोडींचा ऊहापोह केलेला आहे. या सर्व घटनेचा मी साक्षीदार आहे. 2014 मध्ये कोणत्याही पक्षाला राज्यात बहुमत नव्हते. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपला बाहेरून पाठिंबा दिला होता. मी ‘ईडी’च्या धाकामुळे सरकारमध्ये सहभागी झालेलो नाही. 2014, 2017 आणि 2019 मध्ये ईडी नव्हती शिंदे आणि फडणवीस सरकारमध्ये सहभागी होण्यासाठी पक्षश्रेष्ठींची संमती होती. मात्र, नंतर अजित पवार यांना एकाकी पाडण्याचा प्रयत्न झाला. आम्ही त्यांची पाठराखण करण्याची भूमिका घेतली आहे. असे असले तरी शरद पवार हेच आमचे दैवत आहे, नेते आहेत. सुरुवातीपासून त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही कार्यकर्ते घडलो. आमच्या भूमिकेला जिल्ह्यातील बहुतांशी कार्यकर्त्यांनी पाठिंबा दिला आहे. आता सर्व घटक पक्षांना भक्कम करूया. सर्वांना योग्य न्याय देऊया. वयाने ज्येष्ठ असल्याने जबाबदारीने पालकाची भूमिका पार पाडेन. गेली 40 वर्षे समाजकारण आणि राजकारण करीत असताना 25 वर्षे मंत्रिपद मिळाले. विकासकामांसाठी कोट्यवधीचा निधी आणला. याचे पुस्तक विधानसभा निवडणुकीवेळी प्रसिद्ध केले जाईल.

महाराष्ट्र जसा धारकरी आहे तसा तो वारकरी आहे, स्वातंत्र्यासाठी वेळ पडली तर तो हातात तलवार धरील नाहीतर खांद्यावर पताका घेऊन तो मोक्षाची वाट चालू लागेल, असेही ते म्हणाले.

‘तुम लाख कोशिश करो, मुझे रोकने की, तोडने की… मै जब जब टूटा हूँ, मै जब जब बिखरा हूँ, तो दुगनी रफतार से आगे बडा हूँ।’, अशा शब्दांत मुश्रीफ यांनी विरोधकांना इशारा देताच कार्यकर्त्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला. मी सामान्य माणसाच्या विकासाची शपथ घेतली आहे. मी कोणाला कधीही अडचणीत आणले नाही. कोणाच्या वाळलेल्या पालापाचोळ्यावर पाय ठेवला नाही. मात्र, मला अडचणीत आणण्याचा प्रयत्न झाला. अशा कितीही अडचणी आल्या तरी या सर्व अडचणींवर मात करून मी पुढे गेल्याशिवाय राहणार नसल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले.

खा. संजय मंडलिक म्हणाले, ना. मुश्रीफ यांनी ज्येेष्ठत्वाच्या भूमिकेतून युतीमधील तिन्ही पक्षांना बरोबर घेऊन जिल्ह्याचा विकास साधावा. ना. मुश्रीफ यांना ‘ईडी’च्या कारवाईचा त्रास झाला. मात्र, ते खंबीरपणे उभा राहिले आणि या चक्रव्यूहातून बाहेर पडले आहेत. ना. मुश्रीफ पालक असून समरजित घाटगे आणि आम्हाला बरोबर घेऊन ते जाणार आहेत. शाहूंचा विचार देशभर गेला पाहिजे यासाठी ते काम करणार आहेत. त्यांच्या आरोग्य सेवेचा पॅटर्न राज्यभर राबविला जात आहे. विकास कामांमध्ये त्यांचा हात धरणारा दुसरा कोणीही नेता नाही.

तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विकास पाटील यांनी स्वागत केले. जिल्हा बँकेचे संचालक भैया माने यांनी प्रास्ताविक केले. यावेळी विजय काळे, सरपंच शीतल फराकटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांची भाषणे झाली. शहर राष्ट्रवादीचे अध्यक्ष संजय चितारी यांनी आभार मानले.

यावेळी गोकुळ दूध संघाचे अध्यक्ष अरुण डोंगळे, युवराज पाटील, बिद्री साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील, शशिकांत खोत, गणपतराव फराकटे, सतीश पाटील, मनोज फराकटे, प्रवीणसिंह भोसले, शशिकांत पाटील-चुयेकर, अनिल साळुंखे, वसंतराव धुरे तसेच ना. मुश्रीफ यांचे कुटुंबीय उपस्थित होते.

अपमान, बदनामी करीत आहेत काय?

समरजित घाटगे यांच्या भूमिकेबद्दल विचारले असता ना. मुश्रीफ म्हणाले, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान पदासाठी पाठिंबा दिला आहे. या संबंधातील सर्व चर्चा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर झालेल्या आहेत. असे असतानाही मग भाजपचे हे अध्यक्ष असूनही त्यांचा अपमान करून बदनामी करीत आहेत की काय, असा सवाल मुश्रीफ यांनी केला.

इव्हेंट करण्याची मला गरज नाही

मी अतिशय विनयशील व्यक्ती आहे. माझ्यामध्ये परिपक्वता आहे, फाजील आत्मविश्वास नाही, बालिशपणा नाही, कधीही मी विचलित झालो नाही, डगमगलो नाही, त्यामुळे पेपर फाडणे, टीव्ही फोडणे, काचा फोडणे, नॉट रिचेबल राहणे, इव्हेंट करणे, अशी वेळ माझ्यावर कधी आली नाही. कायमपणे सामंजस्यपणे वागल्याचे सांगून मुश्रीफ यांनी समरजित घाटगे यांच्यावर अप्रत्यक्षरीत्या टीका केली.

Back to top button