दुष्काळी स्थितीत धामणीचे महत्व अधोरेखित | पुढारी

दुष्काळी स्थितीत धामणीचे महत्व अधोरेखित

म्हासुर्ली, पुढारी वृत्तसेवा : पावसाळ्यात धो-धो बरसणाऱ्या पावसाने न्हावून निघणारे धामणी खोरे उन्हाळ्यात पाणीटंचाईने पोळून जाते. पाटबंधारे प्रकल्पाअभावी कधी पाण्याच्या अतिरेकात तर कधी पाण्याच्या कमतरतेत येथील शेतीचे व्यवस्थापन करताना लोकांची दमछाक होते. एकिकडे परिस्थितीशी संघर्ष करणे हा जीवनपट झाला आहे. मात्र अलिकडे निर्माण होत असलेल्या ऋतुमानातील बदलांना सामोरे जाताना मात्र नाकीनऊ होत आहे. अशा स्थितीत मात्र धामणी च्या पूर्णत्वाची गरज प्रकर्षाने जाणवून त्याचे महत्व अधोरेखित होत आहे.

जून महिना संपत आला तरी वैशाखातील झळा आजही जाणवत आहेत. पावसाच्या सरींत एरवी गजबजणारी शेतशिवारे निर्मनुष्य दिसत आहेत. जिल्ह्यातील छोट्या मोठ्या धरणांतील पाणिसाठ्याने तळ गाठला आहे. आणखीही पाऊस लांबला तर काही धरणे ओस पडण्याच्या मार्गावर आहेत. शिल्लक असणारे पाणीही संपुष्टात आले तर मोठी आपत्ती कोसळु शकते या शक्यतेतून सर्वच धरण क्षेत्रात पाण्याचे काटेकोर नियोजन चालू आहे.

धामणी नदीक्षेत्रात तर एप्रिल मध्येच नदीपात्र कोरडे पडले आहे. सध्या तर नदीत थोडाफार असणारा ओलावाही नाहीसा झाला आहे. दोन महिने विद्युतपंप उघड्यावर पडल्याने उसपिके होरपळत आहेत. तर खरिप हंगाम साधण्यातही ब्रेक लागला आहे. पावसाची असणारी नक्षत्रांपैकी रोहिणी नक्षत्रातही परिसरात पावसाची हुलकावणी मिळाली. हमखास पावसाचे मृग नक्षत्रही पूर्ण कोरडे गेले. नक्षत्र बदलानंतर पाऊस हजेरी लावेल व शेतीकामांना गती येईल या विचारांत असणारा शेतकरी आकाश पूर्ण निरभ्र झाल्याने अधिकच अडचणीत सापडला आहे. परिसरात खरिपासाठी तयार केलेल्या शेकडो एकर जमिनीत भात पेरणीची कामे खोळंबली आहेत तर ज्यांनी पेरण्या केल्या त्यांच्यावर दुबार पेरणीचे संकट आले आहे.

दुर्दम्य परिस्थितीत येथील जनतेला आशेचा किरण ठरतोय तो येथील धामणी मध्यम प्रकल्प. तब्बल तेवीस वर्षे साकारणाऱ्या या प्रकल्पाचे काम सध्या प्रगती पथावर आहे. आम. प्रकाश आबिटकर यांच्या विशेष प्रयत्नांतून उभारी घेत असलेल्या या प्रकल्पातून येत्या एक – दोन वर्षात पाणी अडवून सोडण्याचे नियोजन आहे. ३.८५ टि. एम. सी. पाणी साठवण क्षमतेचा हा प्रकल्प पूर्ण झाल्यास नदी बारमाही होवून परिसरात हरितक्रांती घडणार आहे. हे आजवर उराशी बाळगलेले स्वप्न असले तरी ते प्रत्यक्षात साकारण्यास आणखीही काही वर्षांची वाट पहावी लागणार आहे.

सध्या परिसरात लोकांवर दुष्काळी आपत्तीसदृष परिस्थिती ओढवली आहे. यापुर्वीही २०१६ साला बरोबरच काही वर्षी अशी परिस्थिती ओढवली होती. सध्या निर्माण झालेल्या परिस्थितीला टक्कर देणे लोकांना कुवतीबाहेरचे झाले असून अर्धवट धामणी मध्यम प्रकल्पाच्या पूर्णत्वाचा मुद्दा अधिक ठळक झाला आहे.

 

Back to top button