कुरुंदवाड परिसरातील विद्यालयात नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत | पुढारी

कुरुंदवाड परिसरातील विद्यालयात नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत

कुरुंदवाड : पुढारी वृत्तसेवा : उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर शाळेची घंटा वाजली. चिमुकल्यांनी पहिल्याच दिवशी शाळेची पायरी चढली. पहिल्या दिवशी येथील सीताबाई पटवर्धन हायस्कूल, साने गुरुजी विद्यालय व जिल्हा परिषदेच्या शाळेत नवागतांचे पुस्तके व गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. त्यामुळे विद्यार्थ्यांतून आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.

दरम्यान जिल्हा परिषद शाळा क्रमांक तीनच्या पहिलीच्या नवागत विद्यार्थ्यांची शहरातून वाजत गाजत फेरी काढून स्वागत करण्यात आले.
शाळेच्या पहिल्या दिवशी नवे शालेय साहित्य, नवा गणवेश, नवे सवंगडी, नवे शिक्षक अशा प्रसन्न उत्साही वातावरणात आज शाळेचा पहिला दिवस होता. नवीन वर्गात विद्यार्थ्यांना नेऊन सोडण्यासाठी पालकांची लगबग सुरू होती. पहिल्या दिवशी नवीन वर्गात प्रवेश करताना नवीन विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर कुतूहल व उत्साह जाणवत होता. वर्गात प्रवेश करून पहिल्या बेंचवर बसण्यासाठी विद्यार्थ्यांची धडपड सुरू होती. सकाळी साडेदहा वाजता प्रार्थना घेण्यात आली.शासनाकडून आलेल्या पाचवी ते आठवीच्या पुस्तकांचे संच व गुलाब पुष्प देऊन विद्यार्थ्यांचे पालकांच्या हस्ते स्वागत करण्यात आले.

सकाळी 11 वाजता पाचवी ते दहावीचे वर्ग सुरू झाले. विद्यार्थ्यांनी शाळेच्या पायऱ्यांचे दर्शन घेऊन आज प्रवेश केला. जुने सवंगडी भेटल्यानंतर एकमेकांना शुभेच्छा देत आनंदोत्सव साजरा करून नवीन वर्ष सुरू झाल्याने शाळेत आनंदाचे वातावरण होते.
प्रारंभी मुख्याध्यापिका विनया जाधव, रवीकुमार पाटील,रोहिणी निर्मळे यांच्यासह शिक्षक शिक्षकांनी यांनी सर्वांचे स्वागत केले. यावेळी पालकांच्या हस्ते सरस्वती पूजन करण्यात आले. त्यानंतर पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना योगेश घाटे पुजारी, रमा घाटे पुजारी, आरती जंगम, अनिता पाटील यांच्या हस्ते पुस्तक संच वाटण्यात आले.

शहरातील साने गुरुजी विद्यालय, एसपी हायस्कूल, कुमार विद्यामंदिर व मुलींची शाळेचे प्रतिनिधी भागात फिरून नवागत विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेसाठी अर्ज वाटप केले आहेत. अजूनही प्रवेश प्रक्रिया सुरू ठेवली आहे. यावेळी प्रशालेचे पर्यवेक्षक श्रीकांत निकाळजे,सदाशिव तिगणे, सतीश माने, बाबासाहेब भूजुगडे, राहुल जंगम, सच्चिदानंद जंगम, रघुनाथ माळी, सुधाकर कांबळे,असलम हुकीरे, प्रकाश मोहिते, जगन्नाथ खडकेसह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Back to top button