एकमेकांना आडवा आणि एकमेकांची जिरवा काँग्रेस-राष्ट्रवादीत रंगला खेळ | पुढारी

एकमेकांना आडवा आणि एकमेकांची जिरवा काँग्रेस-राष्ट्रवादीत रंगला खेळ

कोल्हापूर वार्तापत्र
चंद्रशेखर माताडे

सरकारने पाणीटंचाईवर मात करण्यासाठी ‘पाणी आडवा, पाणी जिरवा’ मोहीम सुरू केली; पण नेत्यांनी त्यातून चांगलाच बोध घेतला आहे. आपल्याला अडचणीचा ठरणार्‍याला ‘आडवा आणि त्याची जिरवा,’ असा उपक्रम हाती घेतला. अलीकडेच कोल्हापूर लोकसभा मतदारसंघासाठी मुंबईत झालेल्या काँग्रेस व राष्ट्रवादीच्या बैठकीत दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी हा खेळ जोरदारपणे खेळला.

कोल्हापूरची लोकसभा निवडणूक लढविण्याचा राष्ट्रवादीचा निर्धार आहे. त्यासाठी तगडा उमेदवार देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. मात्र, तगडा उमेदवार शोधण्यापूर्वीच एकमेकांना अडवून एकमेकांची जिरवण्याची स्पर्धा शरद पवार यांच्यासमोरच रंगली.

गेली काही वर्षे जिल्हा बँकेवर व राष्ट्रवादीच्या जिल्हास्तरीय राजकारणावर हसन मुश्रीफ यांची एक हाती पकड आहे. त्यांचे चिरंजीव नविद हे दूध संघात संचालक आहेत. त्यामुळे ज्यांना पदे मिळाली नाहीत, त्यांनी थेट हसन मुश्रीफ यांचेच नाव लोकसभेसाठी तगडा उमेदवार म्हणून सुचविले. त्यातून मुश्रीफ यांना दिल्लीला पाठवून जिल्ह्यातील राजकारणाची सूत्रे आपल्याकडे यावीत, असे सुचविणार्‍यांचा कल असावा.

मात्र, असल्या गोष्टीला भीक घालतील ते मुश्रीफ कसले. राजकारणाचा वस्ताद समजल्या जाणार्‍या सदाशिवराव मंडलिक यांच्या तालमीत तयार झालेले व मंडलिकांचे कल्याणशिष्य, असा बाबासाहेब कुपेकर यांनी ज्यांचा उल्लेख केला होता ते हसन मुश्रीफ कसलेले मल्ल आहेत. राजकारणातील हिंदकेसरी असा कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष राहिलेल्या शरद पवार यांनी मुश्रीफांचा उल्लेख केला होता. अशा हसन मुश्रीफ यांना या गोष्टी किरकोळ आहेत.

जिल्हा बँकेच्या राजकारणात मुश्रीफ व व्ही. बी. पाटील यांचा टोकाचा संघर्ष झाला होता. व्ही. बी. पाटील मुश्रीफ यांचा ‘कारभारी’ असा उल्लेख करीत त्या व्ही. बी. पाटील यांचेच नाव उमेदवारीसाठी सुचवून हसन मुश्रीफ यांनी आपल्या गळ्यात पडणारी माळ परस्पर बाहेर सरकवली. व्ही. बी. पाटील यांच्याशी जोरदार संघर्ष होऊनही मुश्रीफ यांना त्यांचेच नाव सुचवावे लागले, हा काळाचा महिमा आहे.

त्याचवेळी मुश्रीफ यांनी आणखी एक डाव खेळला. तो म्हणजे आपल्याकडे एक उमेदवार आहे; पण सध्या ते शिवसेनेत आहेत. त्यांना पक्षात घेऊन उमेदवारी देता येईल, असे म्हणत संजय घाटगे यांचे नाव सुचविले. तेव्हा अजित पवार यांनी तुमच्या सोयीचे राजकारण न बघता पक्षाची गरज पाहा, अशा शब्दांत मुश्रीफ यांची हजेरी घेतली. त्यामुळे एकाचवेळी आपल्यावरील संकट टाळत तालुक्यापुरते सोयीचे राजकारण पाहणार्‍या हसन मुश्रीफ यांना परस्पर धक्का बसला.

मुश्रीफ यांचा आडवा-आडवी आणि जिरवा-जिरवीचा खेळ पुढे सुरू ठेवला तो ए. वाय. पाटील यांनी. ‘बिद्री’चे अध्यक्ष के. पी. पाटील आणि गेली अनेक वर्षे विधानसभेसाठी इच्छुक असलेले ए. वाय. पाटील या मेहुण्या-पाहुण्यांत हाडवैर आहे. मुश्रीफांचा आदर्श ठेवत ए. वाय. पाटील यांनी आपल्या मार्गातील काटा बाजूला करण्यासाठी लोकसभेला तगडे उमेदवार म्हणून आपले लाडके मेहुणे के. पी. पाटील यांचे नाव सुचविले. के. पी. निवडून आले, तर दिल्लीला जातील आणि पराभूत झाले, तर विधानसभेसाठी त्यांचे तिकीट कापले जाईल, असा विचार ए. वाय. पाटील करीत असावेत. याची दखल घेत अजित पवार यांनी मुश्रीफ यांना अडचण असल्यास के. पी. पाटील यांनी रिंगणात उतरावे, असे सांगून ए. वाय. पाटील यांचा मार्ग थोडा सोपा केला.

राजेश पाटील यांनी अरुण डोंगळे यांचे नाव सुचविले. आता उमेदवारीसाठी चुरस नसली, तरी पक्ष म्हणून कोणाला तरी उमेदवारी घ्यावी लागेल. आर. के. पोवार यांनी व्ही. बी. पाटील यांच्याबद्दल आग्रही भूमिका मांडताना ते तालीम संघाचे अध्यक्ष असल्याचा आवर्जून उल्लेख केला. संभाजीराजे आणि धनंजय महाडिक यांचा पक्षाला उपयोग झाला नसल्याची तक्रारही काही कार्यकर्त्यांनी केली. त्यामुळे पक्षाचा उमेदवार द्यायचा. उपर्‍याला उमेदवारी द्यायची नाही, यावर सध्या तरी एकमत झाले आहे. उमेदवारी कोणाला मिळणार याचा निर्णय शरद पवारच घेणार आहेत.

हातकणंगलेतून राजू शेट्टी यांना पाठिंबा द्यावा, असा मोठा मतप्रवाह राष्ट्रवादीत आहे. तेथे जयंत पाटील यांचे नाव सुचविण्यात आले आहे. युवा पिढीचे प्रतिनिधी जयंत पाटील यांचे चिरंजीव प्रतीक, जिल्हा बँकेचे संचालक रणवीरसिंह गायकवाड यांची नावे चर्चेत आहेत.

राष्ट्रवादीप्रमाणे काँग्रेसच्या बैठकीत आडवा आणि जिरवा हा खेळ रंगला. पी. एन. पाटील यांनी कोल्हापूर लोकसभेसाठी सतेज पाटील यांचे नाव सुचविले, तर सतेज पाटील यांनी पी. एन. पाटील यांचे नाव सुचविले. या दोघांनाही राज्याच्या राजकारणात राहायचे आहे. मात्र, दोघेही परस्परांचे नाव सुचवून या खेळात रंग भरवत आहेत.

विधानसभेसाठी आतापासूनच तगड्या उमेदवारांचा शोध सुरू

कोल्हापूर जिल्ह्यात सध्या तरी काँग्रेस व राष्ट्रवादीतील आडवा आणि जिरवा या खेळाची चर्चा सुरू झाली आहे. त्याचबरोबर अजित पवार यांनी ज्याला मंत्रिपद पाहिजे, त्याने चार आमदार निवडून आणले पाहिजे, असा दंडकच घातल्याने विधानसभेसाठी आतापासूनच तगड्या उमेदवारांचा शोध सुरू झाला आहे. राष्ट्रवादीचे दोन आमदार आहेत. आता राष्ट्रवादीच्या नेत्यांना मंत्रिपद हवे असेल, तर चार आमदार निवडून आणावे लागतील. आडवा-आडवीच्या आणि जिरवा- जिरवीच्या खेळात आता कोण कोणावर मात करणार हे पहावे लागेल.

हेही वाचा : 

Back to top button