Odisha Train Accident : सदोष रुळांमुळे 289 रेल्वे अपघात

Odisha Train Accident : सदोष रुळांमुळे 289 रेल्वे अपघात
Published on
Updated on

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : Odisha Train Accident : बालासोर रेल्वे अपघाताच्या पार्श्वभूमीवर 2022 चा रेल्वेसेवेबाबतचा कॅगचा अहवाल समोर आला असून त्यात रेल्वेच्या कारभारातील अनेक त्रुटींवर बोट ठेवण्यात आले आहे. रेल्वे रुळांची तपासणी करण्याचे प्रमाण घटत चालल्याबाबत अहवालात चिंता व्यक्त करण्यात आली असून विविध अपघातांनंतरचा चौकशी अहवाल सादर करण्यास अथवा स्वीकारण्यात दिरंगाई होत असल्यावरही त्यात बोट ठेवण्यात आले आहे.

रुळावरून रेल्वे गाड्या घसरण्याच्या प्रकारांबाबतचा कॅगचा हा अहवाल असून त्यात अनेक बाबी समोर आल्या आहेत. अहवालानुसार वारंवार करावयाच्या तपासण्यांची संख्या घटणे, अपघातांसंदर्भातील चौकशी अहवाल स्वीकारणे अथवा सादर करण्यात आलेले अपयश, प्राधान्यक्रमाची कामे करण्यासाठी विशेष रेल्वे निधीचा वापर करण्यात आलेले यश, रेल्वे रुळांच्या नूतनीकरणासाठीच्या निधीत होत असलेली कपात आणि सुरक्षा कामांतील कर्मचार्‍यांच्या संख्येचा तुटवडा आदी प्रमुख त्रुटी दाखवून देण्यात आल्या आहेत. रेल्वे रुळांची तपासणी ही रुळांची भौमितिक व भौतिक स्थिती तपासण्यासाठी असते. अशा तपासण्या नियमित होणे अपेक्षित आहे. त्यात 30 ते 100 टक्के घट झाल्याचे अहवालात म्हटले आहे.

Odisha Train Accident : रेल्वेला मोठा तोटा

रेल्वे रुळांवरून घसरण्यामुळे रेल्वेला 32 कोटी 96 लाख रुपयांचा तोटा झाला आहे. रेल्वेच्या 16 विभागांमध्ये झालेल्या 1127 घटनांच्या अहवालांचा अभ्यास केल्यानंतर हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. रेल्वे रुळांवरून घसरण्यामागचे प्रमुख कारण खराब ड्रायव्हिंग हेच असून लोकोपायलटच्या चुकीमुळे 154 अपघात झाले आहेत.

Odisha Train Accident : यंत्रणा असून वापर नाही

रेल्वेमार्ग व्यवस्थापन यंत्रणा ही वेब आधारित यंत्रणा असून त्यावर रेल्वे मार्गांच्या देखभाल व दुरुस्तीच्या कामांवर देखरेख करता येते. मात्र ही यंत्रणा उपलब्ध असूनही त्याचा वापरच होत नसल्याचे अहवालात म्हटले आहे. या यंत्रणेच्या पोर्टलवरच देखरेख कामांसाठी विशेष विभाग असताना तो कार्यान्वितच नसल्याचे समोर आले आहे. तपासण्यांच्या अहवालानंतरच्या कार्यन्वयन टिपण्याही पोर्टलवर नसल्याचे अहवालात म्हटले आहे. 2017 ते 2021 या काळात रुळांवरून रेल्वे घसरण्याच्या 1127 घटना घडल्या. त्यापैकी 289 म्हणजे 26 टक्के घटना या रेल्वे रुळांच्या नूतनीकरणाशी संबंधित आहेत.

Odisha Train Accident : या आहेत शिफारशी

अहवालात करण्यात आलेल्या शिफारशीत म्हटले आहे की, अपघातांची चौकशी निर्धारित वेळेत पूर्ण झालीच पाहिजे यासाठी रेल्वेने कठोर पावले उचलणे गरजेचे आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि पूर्णपणे स्वयंचलित पद्धतीचा वापर करून रेल्वे रुळांची देखभाल व दुरुस्तीच्या कामांवर देखरेख करावी तसेच नियमित स्वरूपात रेल्वे रुळांच्या तपासण्या व्हायला हव्यात.

अपघात झाल्यानंतर करण्यात येणार्‍या चौकशीच्या अहवालात दाखवून दिलेल्या त्रुटी दूर करून त्या पुन्हा होणार नाहीत याची खबरदारी घेणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी चौकशी अहवाल महत्त्वाचा आहे, असे कॅगने मत नोंदवले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news