‘कोल्हापूर लोकसभे’साठी काँग्रेसही आग्रही | पुढारी

‘कोल्हापूर लोकसभे’साठी काँग्रेसही आग्रही

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील राजकीय स्थिती पाहता कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ काँग्रेसकडेच हवा, अशी अग्रही मागणी जिल्ह्यातील काँग्रेसच्या नेत्यांनी केली. यावेळी कोल्हापूर लोकसभेसाठी आ. पी. एन. पाटील, आ. सतेज पाटील, बाजीराव खाडे, चेतन नरके, तर हातकणंगले लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवार म्हणून माजी खा. जयवंतराव आवळे व माजी आ. संजिवनी गायकवाड यांची नावे सुचविण्यात आली.

वर्षभरावर येऊन ठेपलेल्या लोकसभा निवडणुकीची तयारी सर्वच राजकीय पक्षांनी सुरू केली आहे. गेल्या आठवड्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची बैठक झाली होती. त्यांनीही कोल्हापूर लोकसभा मतदारसंघावर दावा सांगितला आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शनिवारी काँग्रेसच्या नेत्यांची बैठक मुंबईत झाली.

बैठकीस काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्यासह पृथ्वीराज चव्हाण, अशोकराव चव्हाण, बाळासाहेब थोरात, सतेज पाटील, विश्वजीत कदम, प्रणिती शिंदे आदी उपस्थित होते. या बैठकीत कोल्हापूर जिल्ह्यातील लोकसभेच्या दोन्ही जागांबाबत चर्चा झाली. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ. सतेज पाटील यांनी जिल्ह्यातील राजकीय परिस्थिती सांगितली. जिल्ह्यातील राजकीय समीकरणे आता बदलली आहेत.

गेल्या निवडणुकीत मंडलिक शिवसेनेकडून लढले होते. त्यावेळी शिवसेना व भाजपची युती होती. आता खा. संजय मंडलिक आणि आ. प्रकाश आबिटकर यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघामध्ये येणार्‍या विधानसभा मतदारसंघांपैकी तीन मतदारसंघांत काँग्रेसचे आमदार आहेत. दोन विधानसभा मतदारसंघांत राष्ट्रवादी काँग्रेसचे व एका मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे आमदार आहेत. त्यामुळे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ काँग्रसकडेच हवा, असा आग्रह जिल्ह्यातील काँग्रेसच्या नेत्यांनी धरला.

लोकसभेसाठी आ. पी. एन. पाटील यांनी आ. सतेज पाटील यांचे नाव सुचविले. यावेळी त्यांनी त्यांचा जनसंपर्क चांगला आहे, असे सांगितले. त्यानंतर आ. सतेज पाटील यांनी आ. पी. एन. पाटील यांचे नाव सुचविले. यावेळी त्यांनी पी. एन. हे ज्येष्ठ असल्यामुळे तेच योग्य उमेदवार आहेत, असे सांगितले.

Back to top button