कोल्हापूर : पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांची डॉ. जाधव यांच्याशी चर्चा | पुढारी

कोल्हापूर : पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांची डॉ. जाधव यांच्याशी चर्चा

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्याचे नूतन पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी दै.‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांची गुरुवारी सदिच्छा भेट घेतली. जिल्ह्यातील कायदा, सुव्यवस्थेसह विविध प्रश्नांवर पंडित यांनी डॉ. जाधव यांच्याशी चर्चा केली. यावेळी ‘पुढारी’चे चेअरमन व समूह संपादक डॉ. योगेश जाधव उपस्थित होते.

नूतन पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी नुकतीच आपल्या पदाची सूत्रे हाती घेतली. गुरुवारी सायंकाळी त्यांनी ‘पुढारी’ कार्यालयास भेट दिली. ‘पुढारी’ परिवाराच्या वतीने डॉ. योगेश जाधव यांनी पंडित यांचे स्वागत केले. जिल्ह्यातील ऊस दर आंदोलन, टोल आंदोलन, सीमा लढा आदी विविध आंदोलने, चळवळी, सामाजिक प्रश्न आदी विविध विषयांवर चर्चा झाली. सध्याच्या राजकीय आणि सामाजिक घडामोडी, जिल्ह्यातील विविध प्रश्न यावरही डॉ. जाधव आणि पंडित यांच्यात तासभर चर्चा झाली.

‘पुढारी’ आणि डॉ. जाधव यांनी सामाजिक प्रश्नांबाबत घेतलेल्या लोकहिताच्या भूमिकेबद्दल पंडित यांनी ‘पुढारी’चे आणि मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांचे कौतुक केले. जगातील सर्वोच्च रणभूमीवर उभारलेल्या सियाचीन हॉस्पिटलसह ‘पुढारी’च्या सामाजिक योगदानाबद्दल पंडित यांनी गौरवोद्गार काढले.

डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्या हस्ते पंडित यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी समूह सरव्यवस्थापक अनिल पाटील, जिल्हा विशेष शाखेचे पोलिस निरीक्षक तानाजी सावंत उपस्थित होते.

Back to top button