कोल्हापूर : महापूर तोंडावर… उपाययोजना कागदावर! | पुढारी

कोल्हापूर : महापूर तोंडावर... उपाययोजना कागदावर!

कोल्हापूर, सुनील कदम : कोल्हापूर शहर आणि जिल्ह्याला 2019 आणि 2021 मध्ये महापुराचा जबर तडाखा बसला होता. त्यावेळी केंद्र आणि राज्य शासनातील तत्कालीन आणि विद्यमान राज्यकर्त्यांनीही कोल्हापूरला महापुरापासून वाचविण्यासाठी म्हणून अक्षरश: ढीगभर घोषणा केल्या होत्या; मात्र दोन-चार वर्षांचा कालावधी उलटून गेला, तरी यापैकी एकाही घोषणेची अजून अंमलबजावणी झालेली नाही. परिणामी, यंदाही नागरिकांना महापुराचा सामना करावा लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.

पूरसंरक्षक भिंत

ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नद्यांना पूरसंरक्षक भिंती बांधण्यासाठी तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने 1600 कोटी रुपयांची तरतूद केली होती. त्याच धर्तीवर कोल्हापूर शहरात पंचगंगा नदीकाठी पूरसंरक्षक भिंत बांधण्याची घोषणा तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोल्हापुरात येऊन केली होती. यासाठी अंदाजे 170 कोटी रुपयांचा खर्चही गृहीत धरण्यात आला होता; मात्र ही पूरसंरक्षक भिंतीची घोषणा हवेतच विरलेली दिसत आहे. पन्हाळा, भुदरगड आणि चंदगड तालुक्यातील काही गावांमध्ये पूरसंरक्षक भिंत बांधण्यासाठी काहीशी तरतूद झालेली दिसत आहे; पण कोल्हापूरसाठी अजून एक छदामही मिळालेला नाही.

बहुचर्चित बास्केट ब्रीज

महापुरावेळी महामार्गावरील आणि कोल्हापूर शहरात येणारी वाहतूक बंद होऊ नये, यासाठी शिरोली ते उचगावदरम्यान बास्केट ब्रीज उभारण्याची घोषणा झाली होती. जानेवारीमध्ये या बास्केट ब्रीजचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते भूमिपूजनही झाले; पण घोषणा आणि भूमिपूजनाच्या पलीकडे याबाबतीतही अजून काही झालेले नाही.

महामार्गाची उंची वाढविणे

महामार्गाच्या कामावरील भराव कोल्हापूर शहर आणि परिसरात महापूर पसरण्यास कारणीभूत ठरतो, ही बाबही स्पष्ट झालेली आहे. त्यामुळे महामार्गाचे सहापदरीकरण करताना हा भराव काढून टाकण्याचीही घोषणा झाली होती. सध्या महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम सुरू आहे; पण भराव काढून टाकण्याऐवजी सध्या असलेल्या उंचीनुसारच काम सुरू असलेले दिसत आहे. त्यामुळे हा महामार्ग आणखी काही प्रमाणात उंच करून महापुरात आणखी भर पडण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

दुष्काळी भागाला पाणी

महापुराचे अतिरिक्त पाणी सांगली जिल्ह्यातील दुष्काळी भागाकडे वळविण्याबाबतही घोषणा करण्यात आली होती. त्यासाठी सांगली जिल्ह्यातील ताकारी-म्हैसाळ आणि टेंभू योजनेचा विस्तार करण्याची घोषणाही झाली होती. त्याप्रमाणे तत्कालीन जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी म्हैसाळ योजनेच्या जतमधील सहाव्या टप्प्याला मंजुरी दिली होती.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या योजनेसाठी 1180 कोटी रुपयांचा निधीही जाहीर केला होता; मात्र ही योजनाही अजून लालफितीच्या कारभारात आणि निधी टंचाईत अडकून पडली आहे.

बोगद्यातून पाणी वळविणे

महापुराला कारणीभूत ठरत असलेले पंचगंगेचे आणि तिच्या उपनद्यांचे पाणी बोगद्यांच्या माध्यमातून राजापूरकडे वळविण्याची घोषणा तत्कालीन जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी केली होती. बहुदा ही नुसतीच तोंडदेखली घोषणा होती. कारण, या योजनेतील फोलपणा लक्षात आल्यानंतर जलसंपदा विभागाने या कामाचा सर्व्हे करण्याचीसुद्धा आजअखेर तसदी घेतलेली नाही.

यंदाही महापूर येण्याची दाट शक्यता

जगभरातील, देशातील आणि राज्यातील हवामानतज्ज्ञांनी यंदा देशात आणि महाराष्ट्रात समाधानकारक पाऊस पडण्याचे अंदाज व्यक्त केले आहेत. काही तज्ज्ञांच्या मते यंदा सरासरीपेक्षा जादा, काहींच्या मते सरासरीइतका तर काहीच्या मते सरासरीपेक्षा थोडाफार कमी पाऊस पडेल, असे भाकित वर्तविण्यात आले आहे. याचा अर्थ यंदा पाऊस कमी पडणार नाही. त्यामुळे नेहमीप्रमाणे सरासरीइतका किंवा त्यापेक्षा काहीसा कमी पाऊस झाला तरी कोल्हापूरला महापुराचा धोका संभवतो. मागील दोन-तीन महापुरांनी कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील अनेक भागांची वाताहत करून टाकली आहे. या महापुराच्या तडाख्यातून अजूनही इथले उद्योग-व्यवसाय पुरेसे सावरलेले नाहीत. त्यामुळे आता पुन्हा महापूर आल्यास सगळेच कोलमडण्याचा धोका आहे.

नदीजोड प्रकल्प

इथला महापुराचा ताण कमी करण्यासाठी नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून इथले पाणी भीमा खोर्‍याकडे वळविण्याचीही घोषणा झाली होती; मात्र घोषणेपलीकडे अद्याप तरी या योजनेचे काही स्पष्ट भवितव्य दिसून येत नाही. अशा पद्धतीने राज्यकर्त्यांनी घोषित केलेल्या महापूर उपाययोजना पुढच्या महापुराची चाहूल लागली, तरी अजूनही कागदावरच असलेल्या दिसत आहेत. याबाबतीत जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनाही फारसे गांभीर्य असलेले आढळून येत नाही.

Back to top button