संघटित गुंडगिरी, तस्करी टोळ्यांचा बीमोड करू : पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित | पुढारी

संघटित गुंडगिरी, तस्करी टोळ्यांचा बीमोड करू : पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित

कोल्हापूर : मदतीच्या भावनेने पोलिस ठाण्यांची पायरी चढणार्‍या सर्वसामान्यांसह तळागाळातील लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कोल्हापूर पोलिस दल प्रामाणिकपणे आणि प्राधान्याने प्रयत्न करेल, अशी ग्वाही नूतन पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना दिली.

संघटित गुंडगिरी, काळे धंदेवाल्यांसह महामार्गावरील तस्करी टोळ्यांविरुद्ध कठोर पावले उचलण्यात येतील, असेही ते म्हणाले. पंडित यांनी शुक्रवारी सायंकाळी मावळते पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्याकडून पदभार स्वीकारला. यावेळी अप्पर अधीक्षक जयश्री देसाई, निकेश खाटमोडे- पाटील यांच्यासह जिल्ह्यातील पोलिस उपअधीक्षक, पोलिस ठाण्यांचे प्रभारी उपस्थित होते.

शांतता-सुव्यवस्थेला प्राधान्य देणार

शहर व जिल्ह्यात शांतता- सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी प्राधान्य राहील. जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यांना प्रत्यक्ष भेटी देऊन तेथील अडीअडचणी, पोलिसांच्या समस्या समजावून घेऊन त्यावर उपाय शोधण्याचा प्रयत्न करू. मदत मिळेल या भावनेने सर्वसामान्य, तळागाळातील लोक पोलिस ठाण्यांत येतात. त्यांच्या समस्या, अडीअडचणी समजावून घेऊन त्याचे निवारण केले जाईल, असेही ते म्हणाले.

विधायक उपक्रमांचा स्वत: पाठपुरावा करणार

घटना दखलपात्र असो वा अदखलपात्र असो, पोलिसांकडून योग्य ती कार्यवाही केली जाईल. तत्कालीन पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख, शैलेश बलकवडे यांनी जे विधायक उपक्रम राबविले ते तसेच सुरू राहतील, यासाठी आपण पाठपुरावा करू, असेही ते म्हणाले.
पोलिस उपअधीक्षक (मुख्यालय) प्रिया पाटील, शहर पोलिस उपअधीक्षक अजित टिके, जिल्हा विशेष शाखेचे वरिष्ठ निरीक्षक तानाजी सावंत, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक महादेव वाघमोडे आदींनी नूतन पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांचे स्वागत केले.

Back to top button