‘भारत आणि दहशतवाद’ या विषयावर आज अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांचे व्याख्यान | पुढारी

‘भारत आणि दहशतवाद’ या विषयावर आज अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांचे व्याख्यान

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : शिवाजी विद्यापीठाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘पुढारी’कार पद्मश्री कै. डॉ. ग. गो. जाधव स्मृती व्याख्यानमालेत निष्णात कायदेपंडित पद्मश्री अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांचे शनिवारी (दि. 20 मे) सायंकाळी 4.45 वाजता राजर्षी शाहू स्मारक भवन, दसरा चौक येथे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. ‘भारत आणि दहशतवाद’ या विषयावर ते या व्याख्यानमालेत आपले पुष्प गुंफणार आहेत.

भारतापुढील दहशतवादाचे गंभीर आव्हान, त्यातील उपाययोजना अशा विविधस्पर्शी मुद्द्यांवर ते व्याख्यानातून आपले विचार मांडणार आहेत.

शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. डी. टी. शिर्के हे व्याख्यानमालेचे अध्यक्षस्थान भूषवणार असून, विद्यापीठाचे प्र-कुलगुरू प्रा. डॉ. पी. एस. पाटील हे प्रमुख उपस्थित राहणार आहेत.

अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांचा विविध विषयांवर सखोल अभ्यास आहे. अनेक किचकट आणि गुंतागुुंतीच्या खटल्यांमध्ये त्यांनी विशेष सरकारी वकील म्हणून काम पाहिले आहे.

26/11/2008 रोजी मुंबईवर पाकिस्तान प्रशिक्षित दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात अजमल कसाब हा एकमेव दहशतवादी जिवंत सापडला. कसाबला फाशीची शिक्षा देण्यात आली. या सर्व खटल्यामध्ये विशेष सरकारी वकील म्हणून अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांनी काम पाहिले आहे.

हा खटला अत्यंत किचकट होता. मात्र, आपल्या ज्ञानकौशल्याच्या बळावर अ‍ॅड. निकम यांनी सरकारच्या वतीने न्यायालयात बाजू लढविली. आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानी दहशतवादाचा भेसूर चेहरा त्यांनी उघड करून दाखविला. भारतासमोर दहशतवादाचे आव्हान आजही कायम आहे. भारताविरुद्धच्या दहशतवादात पाक लष्कराचा उघड सहभाग असल्याचे ट्विट गुरुवारीच पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी केले. त्यामुळे जगभर खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर ‘भारत आणि दहशतवाद’ या विषयावर अ‍ॅड. निकम यांचे व्याख्यान होणार आहे.

व्याख्यान नियोजित वेळेतच

अ‍ॅड. उज्ज्वल निकम त्यांच्या नियोजित कार्यक्रमासाठी परगावी जाणार आहेत. त्यामुळे ‘पुढारी’कार डॉ. ग. गो. जाधव व्याख्यानमालेतील त्यांचे व्याख्यान सायंकाळी ठिक 4.45 वाजता सुरू होणार आहे. त्यामुळे या व्याख्यानास सर्वांनी नियोजित वेळेपूर्वी 15 मिनिटे आधी उपस्थित राहावे, असे आवाहन शिवाजी विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे यांनी केले आहे.

Back to top button