‘ती’ मृत अर्भके सीपीआरमधील नाहीत | पुढारी

‘ती’ मृत अर्भके सीपीआरमधील नाहीत

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : सीपीआर रुग्णालयाच्या आवारातील शवविच्छेदन कक्षाजवळ गुरुवारी सापडलेली ‘ती’ दोन मृत अर्भके सीपीआरमधील नाहीत, असा निष्कर्ष चौकशी समितीने काढला आहे. समितीने राजर्षी छत्रपती शाहू महाराज वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रदीप दीक्षित यांच्याकडे अहवाल दिला आहे. दरम्यान, या प्रकरणाची तपासाची भिस्त आता पोलिसांवर आहे. सीपीआरच्या प्रशासनाने पोलिस प्रशासनाकडे बोट दाखवून या प्रकरणातून आपले हात झटकले आहेत.

गुरुवार, दि. 20 एप्रिलला सीपीआर रुग्णालयाच्या आवारातील शवविच्छेदन कक्षाजवळ दोन नवजात अर्भकांच्या मृतदेहाचे लचके तोडताना भटकी कुत्री आढळून आली होती. हा प्रकार एका कर्मचार्‍याच्या लक्षात येताच. त्याने याबाबत प्रशासनाला कळविले. त्यानंतर प्रशासन आणि पोलिस तेथे दाखल झाले. त्यावेळी दोन नवजात अर्भकांचे मृतदेह असल्याचे आढळून आले होते. या घटनेचे गांभीर्य ओळखून राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठात डॉ. प्रदीप दीक्षित व वैद्यकीय अधीक्षक डॉ. गिरीष कांबळे यांनी या प्रकरणाची तातडीने चौकशी करण्यासाठी 5 सदस्यीय वैद्यकीय समिती नेमली. तसेच पोलिसांकडेही तक्रार दिली. त्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरू होता. वैद्यकीय महाविद्यालयाने नेमलेल्या समितीला चार दिवसांत अहवाल देण्याची सूचना अधिष्ठातांनी दिली होती. त्यानुसार सोमवारी दुपारी हा अहवाल समितीने अधिष्ठाता यांच्याकडे सुपूर्द केला.

वैद्यकीय समितीने 17 ते 21 एप्रिल या काळात सीपीआरमध्ये स्वभाविका जन्मलेल्या व सिजेरियनद्वारे जन्मलेल्या सर्व अर्भकांची माहिती घेण्यात आली. त्यामध्ये दोन नवजात अर्भकांचा सीपीआरमध्ये मृत्यू झाला होता, असे आढळून आले. या मृत अर्भकांचे दफन कदमवाडी येथील दफनभूमीत केले आहे. महापालिकेकडून तशा रितसर दफन पावत्याही मिळालेल्या आहेत. त्याच्या सर्व नोंदी वैद्यकीय समितीने तपासल्या आहेत. उपलब्ध सीसीटीव्ही फुटेजदेखील या समितीने तपासले. त्यानंतर या समितीने अहवाल तयार करून प्रशासनाला सादर केला असून, ती मृत नवजात अर्भके सीपीआरमधील नाहीत, असा निष्कर्ष दिला आहे.

प्रकरणाचे गूढ कायम

सीपीआर आवारात सापडेली मृत अर्भके सीपीआरमधील नाहीत, असा निष्कर्ष वैद्यकीय समितीने काढल्याने आता पोलिसांची जबाबदारी वाढली आहे. पोलिस प्रशासन या घटनेच्या मुळापर्यंत जाण्याचा प्रयत्न करत आहे. तूर्त पोलिसांंच्या हाती काही लागलेले नाही. परंतु, पोलिसांची तपासाची दिशा या प्रकरणाच्या मुळापर्यंत लवकरच पोहोचेल, असे काही पोलिस अधिकार्‍यांनी सांगितले.

मग अर्भके आली कोठून

सीपीआरमध्ये सीसीटीव्ही कॅमेर्‍यांची संख्या पुरेशी असल्याचा दावा आहे. बंदूकधारी सुरक्षा रक्षकही प्रवेशद्वारावर तैनात आहेत. एवढी सुरक्षाव्यवस्था भेदून मृत अर्भके कोणी टाकली असतील, याचा शोध पोलिस त्यांच्या पद्धतीने घेतीलच; पण सीपीआरच्या प्रशासनाला त्यांची जबाबदारी कशी झटकता येईल? असा सवालही आता उपस्थित केला जात आहे.

Back to top button