कळंबा कारागृहात पुन्हा मोबाईल सापडला | पुढारी

कळंबा कारागृहात पुन्हा मोबाईल सापडला

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : गेल्या आठवड्यात गांजा, मोबाईलचे पार्सल सापडल्याचे प्रकरण ताजे असतानात रविवारी पुन्हा कळंबा मध्यवर्ती कारागृहाच्या पाठीमागील ड्रेनेजमध्ये एक मोबाईल, चार्जर आणि बॅटरी सापडली.

या पार्श्वभूमीवर विशेष दक्षता पथकाच्या अधिकार्‍यांनी रविवारी सकाळी दोन तास सर्वच बरॅकमधील कैद्यांची झडती घेतली, त्यांचे साहित्य तपासले. यावेळी सर्कल नंबर चार विभक्त कोठडी क्रमांक 13 व 14 च्या पाठीमागील ड्रेनेजमध्ये एक मोबाईल, चार्जर आणि बॅटरी सापडली आहे. याबद्दल तुरुंगाधिकारी भारत उत्तरेश्वर पाटील (वय 50, रा. जेल अधिकारी निवासस्थान) यांनी अज्ञात कैद्यावर जुना राजवाडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. हा मोबाईल कारागृहात कोणी आणला, त्यावर कोणी संभाषण केले होते, याची माहिती पोलिस काढत आहेत.

पश्चिम विभागाचे कारागृह उपमहानिरीक्षक यांनी कळंबा कारागृहाची झाडाझडती घेण्याचे आदेश विशेष दक्षता पथकाला दिले होते. त्यानुसार रविवारी सकाळी आठ ते दहा असे दोन तास तपासणी व झडती मोहीम राबवण्यात आली. सर्व कैद्यांच्या साहित्याची तपासणी केली यावेळी सर्कल नंबर चार विभक्त कोठडीजवळील ड्रेनेजमध्ये एक मोबाईल, बॅटरी व चार्जर असे प्लास्टिक पिशवीत ठेवण्याचे दिसून आले. 650 रुपयांचे हे साहित्य जप्त करून ते पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

हा मोबाईल कारागृहात कोणी आणला, त्यावर कोणी संभाषण केले होते, याची माहिती पोलिस काढत आहेत. कारागृहात बंदी असणार्‍या ठिकाणी अशा वस्तू सापडत असल्याने सुरक्षेबद्दल तीव— नाराजी व्यक्त केली जात आहे. कारागृहात प्रत्येक ठिकाणी सीसीटीव्ही असतानाही मोबाईल व गांजा कोठून येतो, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

कळंबा कारागृहातील सुरक्षेला सुरुंग लावून काही कैदी कारागृहात आमली पदार्थ, मोबाईल घेऊन जात असल्याने उघड झाले आहे. याबाबत कारागृह प्रशासनाने वेळोवेळी अशा कैद्यांवर गुन्हा दाखल केला आहे. कारागृहाच्या भिंतीवरून पार्सल आत फेकण्याचे प्रकारही अलिकडे घडत असल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढत आहे. यासाठी सुरक्षा अधिक कडक करावी लागणार आहे.

Back to top button