सत्ता द्या, ‘राजाराम’ राज्यात पहिल्या पाचमध्ये आणतो : आमदार सतेज पाटील | पुढारी

सत्ता द्या, ‘राजाराम’ राज्यात पहिल्या पाचमध्ये आणतो : आमदार सतेज पाटील

कसबा बावडा, पुढारी वृत्तसेवा : 2032 मध्ये राजाराम कारखान्याला 100 वर्षे पूर्ण होतात, या ऐतिहासिक कारखान्याची सत्ता द्या, कारखाना राज्यात पहिल्या पाचमध्ये आणतो, असे प्रतिपादन आमदार सतेज पाटील यांनी कसबा बावडा येथील राजर्षी छत्रपती शाहू परिवर्तन आघाडीच्या प्रचार सभेत केले. सभेच्या अध्यक्षस्थानी श्रीराम सेवा संस्थेचे सभापती हिंदुराव ठोंबरे होते. यावेळी डी. वाय. पाटील शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

आमदार पाटील म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्याचे अर्थकारण शेती, दूध, उद्योग, व्यवसाय आणि नोकरी यावर चालते. साखर कारखानदारीच्या माध्यमातून 3500 कोटी रुपये शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा होतात. 38 वर्षांपूर्वी सहकारी झालेला कारखाना महाडिक यांच्या कारभारामुळे 28 वर्षांपूर्वी पुन्हा खासगी झाला आहे, अशी परिस्थिती आहे. कारखाना पुन्हा सभासदांच्या मालकीचा करण्यासाठी आमचा लढा सुरू आहे. 12 हजार सभासदांच्या न्यायासाठी गेली सात वर्षे आमची लढाई सुरू आहे. येणार्‍या काळात ऊस उत्पादन वाढवण्याबरोबर शेतकर्‍यांना शेअर्सला महिन्याला 7 किलो साखर, दीपावली सणासाठी 7 किलो जादा साखर देण्याचा मानसही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

आमदार पाटील पुढे म्हणाले, राजाराम कारखानाच्या जीवावर महाडिक यांचा बेडकीहाळ कारखाना उभारला आहे. राजाराममधील साखर घोटाळ्यासह इतर घोटाळे बाहेर येऊ नयेत यासाठीच महाडिक ही निवडणूक लढवत आहेत. राजाराम कारखाना सहकारी करण्यामध्ये कसबा बावड्यासह इतर अनेक गावांतील शेतकर्‍यांचे योगदान आहे, बावड्याने राजाराम कारखान्यासाठी काय केले म्हणणार्‍यांना कसबा बावड्यातील सभासद येणार्‍या 23 तारखेला त्यांची जागा दाखवतील.

कार्यक्रमात बोलताना डॉ. संजय पाटील म्हणाले, डी. वाय. पाटील शिक्षण संस्थेची सुरुवात 1984 साली झाली आणि राजाराम कारखाना ही 1984 साली सहकारी झाला. कारखान्याची सद्यस्थिती पाहता डोळ्यात पाणी येते, सहकारी झाला तेव्हा कर्जमुक्त असणार्‍या कारखान्यावर कर्जाचा डोंगर उभा राहिला आहे.

राजाराम कारखान्याचे माजी अध्यक्ष हरीश चौगले म्हणाले, राजाराम कारखाना गेल्या 28 वर्षांत महाडिक यांच्या कारभारामुळे अधोगतीला गेला आहे. कारखान्याला गतवैभव मिळवून देण्यासाठी परिवर्तन पॅनेल विजयी करा.

आमदार ऋतुराज पाटील यांनी प्रचाराच्या निमित्ताने कार्यक्षेत्रातील सात हजार सभासदांची संपर्क साधल्यानंतर सभासदांमध्ये प्रचंड रोष असून कारखान्यांमध्ये परिवर्तन अटळ असल्याचे सांगितले.

महेश चव्हाण यांनी महाडिक यांची सत्ता उलटवून राजाराममध्ये सभासदांच्या हिताचा नवा अध्याय सुरू करण्यासाठी बंटी पाटील यांचे हात बळकट करण्याचे आवाहन केले यावेळी गोकुळ संचालिका अंजनाताई रेडेकर, बी. एच. पाटील, सुरेश पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी आमदार जयश्री जाधव मधुआप्पा देसाई, बाजीराव पाटील, शशिकांत खवरे, महेश चव्हाण, बाबासो चौगले, शशिकांत पाटील-चुयेकर, बयाजी शेळके, अंजनाताई रेडेकर, स्मिता गवळी, निवासराव पाटील, जयसिंग ठाणेकर, जे. एल. पाटील, पृथ्वीराज पाटील, तेजस पाटील यांच्यासह श्रीराम संस्थेचे संचालक, माजी नगरसेवक, नगसेविका, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोल्हापूर जिल्ह्याचे राजकारण, समाजकारण महाडिक यांनी बिघडवले

स्वतःहून एक ही संस्था स्थापन करू न शकलेल्या महाडिक यांनी 25 वर्षांत फक्त संस्थांमध्ये घुसण्याचे काम केले आहे, याचे उत्तम उदाहरण राजाराम कारखाना आणि गोकुळ दूध संघ होय, राजाराममध्ये भगवान पवार तर गोकुळमध्ये आनंदराव पाटील-चुयेकर यांचा गळा कापण्याचे काम महाडिक यांनी केल्याचा आरोप पाटील यांनी यावेळी केला.

म्हणून 25 वर्षे मुन्नाला कारखान्यात बोलवले नाही : सर्जेराव माने

खासदार धनंजय महाडिक यांना 25 वर्षांत कधी राजाराम कारखान्यात कोणत्याही कार्यक्रमाला महादेवराव महाडिक यांनी बोलवले नाही, पुतण्या आत घुसेल आणि पोराची अडचण होईल अशी त्यांना भीती होती का, असा सवाल सर्जेराव माने यांनी केला.

कारखान्याला वॉचमनची गरज नाही : माने

सकाळी 9 ते 12 कारखान्यावर बाप बसतो, दुपारी 12 ते 4 चिरंजीव त्यानंतर दुपारी 4 पासून पुढं पुन्हा बाप कारखान्यावर असतो त्यामुळे राजाराम कारखान्यावर वॉचमनची गरजच राहिलेली नाही, असे सर्जेराव माने म्हणाले.

Back to top button