[author title="कैलास शिंदे" image="http://"][/author]
नेवासा : लोकसभेचा निकाल काहीही लागो याची चिंता शेतकर्यांना नाही. यंदा पाऊस चांगल्या प्रकारे होण्याची शक्यता असल्याने शेतकरीवर्गात समाधानाचे वातावरण आहे. तालुक्यातील अनेक गावांत पाणीटंचाई जाणवत आहे. उन्हाच्या तडाख्यामुळे घरात बसणे नको झाले आहे. ग्रामीण भागात नागरिक झाडांचा आधार घेत आहेत. सध्या शेतकरी खरिपाच्या तयारीत गुंतला आहे. पावसाची प्रतीक्षा करीत आहे. पेरणीपूर्व मशागतीला नेवासा तालुक्यात वेग आला आहे. बी-बियाणे घेण्यासाठी शेतकर्यांची धावपळ होताना दिसत आहे.
गेल्या वर्षीपेक्षा मान्सून चांगल्या प्रकारे बरसेल असा अंदाजही हवामान विभागाने वर्तविला आहे. मान्सूनची चाहूल लागल्याने तालुक्यातील आठही महसूल मंडलांतील बळिराजा आता खरीप हंगामाच्या पूर्वतयारीला लागला असून, कृषी विभागानेही खरीप हंगामाची जय्यत तयारी केली आहे. नियोजनाच्या तयारीसाठी बैठका होत आहे. बळिराजाला आस लागून राहिलेला नैर्ऋत्य मान्सून येत्या काही दिवसांत अंदमानात दाखल होत असून, महाराष्ट्रात जूनच्या दुसर्या आठवड्यात धडक देण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
तालुक्यात सर्वच ठिकाणी पूर्वमशागती जवळपास उरकत आल्या असून, शेतकर्यांनी लागवड आणि पेरण्यांसाठी शेतजमीनीची मशागत उरकली आहे. तालुक्यात खरीप हंगामात प्रामुख्याने कापूस व सोयाबीन पिकाकडे कल दिसून येतो. यंदाच्या खरीप हंगामात सोयाबीन, कपाशीबरोबर मका, बाजरी, तूर, उडीद, मूग, भुईमूग, कांदा ही पिके घेण्याकडे शेतकर्यांचा कल आहे.
गतवर्षी तालुक्यात सरासरीच्या तुलनेत तालुक्यात अवघा 87 टक्के पाऊस झाला होता. तालुक्याचे सरासरी पर्जन्यमान 416 मिलिमीटर असताना गतवर्षी प्रत्यक्षात 362 मिलमीटर पाऊस पडला होता. त्यामुळे सरासरीच्या पर्जन्यमानात 13 टक्के घट आली होती. पावसाचा खंड पडल्याने खरीप पिके जळून शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले होते. तालुक्यातील आठपैकी सहा महसूल मंडलांत पावसाचा मोठा खंड पडून पिके जळाली होती. त्यामुळे खरीप पिकाचे अतोनात नुकसान झाले होते.
गतवर्षी रब्बी हंगामात कमी पर्जन्यमानामुळे पाणीपातळीत घट आल्याने कमी कालावधीची पिके घेण्यावर शेतकर्यांचा कल राहिला. आता हे सर्व नुकसान सोसून यंदा पुन्हा एकदा बळिराजा खरीप हंगामाच्या जोमाने तयारीला लागलेला दिसत आहेत. उधार उसनवारी करून शेतकरी बी-बियाणे खरेदी करत आहे.
या वेळी कपाशी बियाणे मोठ्या प्रमाणात आले असल्याने व यामध्ये वेगवेगळ्या वाणाचे प्रकार असल्याने नेमकी कोणते वाण लावावे यामध्ये मात्र शेतकर्यांमध्ये संभ्रम होत आहे. तसेच तुरीला यंदा चांगला भाव मिळत असल्याने तुरीकडे शेतकर्यांचा कल आहे. नांगरणी, रोटा, कांदा काढणी होऊन खरिपासाठी जमीन तयार करण्यात शेतकरी गुंतला आहे. अवकाळी पावसाने व वादळाने फळबागांच्या नुकसानीची सल मनात धरून शेतकरीवर्ग खरीप तयारीत व्यस्त असल्याचे दिसत आहे.
लोकसभा निवडणुकीत धनुष्यबाण, मशाल, प्रेशर कुकर अन्य कोणीही येवो याचा विचार शेतकरी करताना दिसत नसला, तरी राजकीय कार्यकर्ते मात्र आकडेवारीत गर्क झाले आहे.
सोयाबीनमध्ये घट होण्याची शक्यता गेल्या हंगामात सोयाबीनचे दर काढणीच्या काळात पाच हजारांच्या आसपास होते. त्यानंतर दर सातत्याने घसरून हमीभावाच्याही खाली आले. आजही ते हमीभावाच्या खालच्या पातळीवर स्थिर आहे. आगामी काळातही दर वाढण्याची शक्यता नसल्याने सोयाबीनच्या पेर्यात कमालीची घट होण्याची शक्यता आहे.
गत हंगामात तालुक्यातील आठ महसूल मंडलांपैकी नेवासा बुद्रुक, घोडेगाव, चांदा आणि सोनई या चार महसूल मंडलांत पावसाचा खंड आणि कमी पर्जन्यमानामुळे खरीप पिकाचे नुकसान झाले होते. सरासरी उत्पादनातही तूट येऊनही आजपर्यंत शेतकर्यांना पीकविमा भरपाई मिळालेली नाही.
मान्सूनची चाहूल लागली आहे. खरीप मशागतीला वेगही आला आहे. कपाशी, सोयाबीन, मका, बाजरी पिकाकडे बळिराजाचा कल असला, तरी तूर पिकाला बर्यापैकी भाव असल्याने तूर पेरणी शेतकर्यांनी करावी.
– डॉ. अशोकराव ढगे, कृषितज्ज्ञ
हेही वाचा