कोल्हापूर विभागात 3,484 कोटी विक्रमी जीएसटी जमा | पुढारी

कोल्हापूर विभागात 3,484 कोटी विक्रमी जीएसटी जमा

कोल्हापूर, सचिन टिपकुर्ले : कोल्हापूर विभागाने जीएसटी संकलनात प्रथमच तीन हजार कोटी रुपयांचा टप्पा पार केला असून आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये तीन हजार 484 कोटी रुपयांचा कर जमा झाला आहे. सन 2017 मध्ये जीएसटी करप्रणाली लागू झाल्यानंतर कोल्हापूर विभागाने प्रथमच तीन हजार कोटी वसुलीचा टप्पा पार केला आहे. 2021-22 मध्ये विभागाने 2923 कोटी जीएसटी जमा केला होता. गतवर्षीच्या तुलनेत या आर्थिक वर्षात 19 टक्के वाढ झाली आहे.

केंद्र सरकारने देशात एकच कर प्रणाली लागू करण्यासाठी जीएसटी कायद्याची अंमलबजावणी केली. गरजेनुसार या करप्रणालीमध्ये बदल करण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री व प्रत्येक राज्याचे अर्थमंत्री यांची समन्वय समिती तयार केली. या समितीमार्फत आढावा घेऊन काही वस्तूंवर कर वाढवण्यात आले आहेत. त्यामुळे शासनाच्या महसुलात वाढ होत आहे.

देशात मार्च 2023 मध्ये जीएसटीचा एकूण महसूल 1 लाख 60 हजार कोटी इतका आहे. महाराष्ट्रात मार्च 2023 मध्ये जीएसटी महसूल 22 हजार 695 कोटी आहे. देशांतर्गत वाढलेली आर्थिक उलाढाल, वस्तू खरेदीत वाढ, नियमित कर भरणा करणार्‍या व्यापार्‍यांच्या संख्येत झालेली वाढ, कर प्रणालीतील पारदर्शकता, तसेच करचोरी, बोगस नोंदणी करणारे यांच्याविरोधात विभागाने मोठ्या प्रमाणात कारवाई केल्याने करसंकलनात वाढ होत आहे.

व्यापार्‍यांनी जीएसटी चुकवू नये यासाठी या विभागाकडून विशेष लक्ष देण्यात आले आहे. जीएसटी विभाग आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे व्यवहार, उलाढालीवर नजर ठेवून आहे. विवरण पत्रक वेळेत न भरणार्‍याविरुद्ध तात्काळ कारवाई करण्यात येत आहे. ई-वे बिलाशिवाय माल वाहतूक करणार्‍या व्यापार्‍यांविरुद्ध दंडाची व मालाच्या जप्तीची कारवाई करण्यात आली, वस्तू न घेता बोगस बिल काढून शासनाची आर्थिक फसवणूक, कमी दराने कर भरणा करणे असे काही प्रकारही समोर आले. याविरुद्ध विभागाने कारवाई केली आहे.

महसूल वाढ उद्यमशीलतेचे प्रतीक : सुनीता थोरात-पाटील

कोल्हापूर विभागाच्या जीएसटी महसुलात 561 कोटी इतकी झालेली वाढ ही वाढत्या उद्यमशीलतेचे प्रतीक आहे. करदात्यांच्या सहकार्यामुळेच संकलनात वाढ झाली आहे. शिवाय रद्द झालेला जीएसटी नोंदणी क्रमांक पुन्हा सुरु करता येईल. यासाठी नवीन आदेश काढण्यात आला आहे, याचा जास्तीत जास्त व्यापार्‍यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन कोल्हापूर विभागाच्या सहआयुक्त सुनीता पाटील-थोरात यांनी केले आहे.

Back to top button