कोल्हापूर मनपाचे 81 प्रभाग | पुढारी

कोल्हापूर मनपाचे 81 प्रभाग

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : मुंबई मनपासंदर्भात उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशामुळे कोल्हापूर महापालिकेतही आता 92 ऐवजी नगरसेवकांची संख्या 81 राहणार आहे. त्याबरोबरच निवडणूक बहुसदस्य प्रभाग रचनेनुसार होणार असून 3 किंवा 4 नगरसेवकांचा एक वॉर्ड असेल. ओबीसी आरक्षणाचा विषय न्यायप्रविष्ट आहे. त्यानंतर निवडणुकीचा बिगुल वाजेल.

कोल्हापूर मनपाची मुदत 15 नोव्हेंबर 2020 रोजी संपली. निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार डिसेंबर 2020 पासून निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली. त्यावेळी एक सदस्य प्रभाग रचना आणि 81 नगरसेवक संख्या यानुसार प्रक्रिया सुरू करण्यात आली. प्रभाग रचना, आरक्षण सोडत, मतदार याद्या जाहीर करणे आदी कामे पूर्ण झाली होती. मात्र मार्च 2021 मध्ये निवडणूक प्रक्रिया स्थगित झाली.

महाविकास आघाडी सरकारने सप्टेंबर 2021 मध्ये बहुसदस्य प्रभाग रचनेनुसार निवडणुका घेण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार प्रभाग रचना करण्याचे आदेश महापालिकेला दिले. 7 ऑक्टोबर 2021 कोल्हापूर शहरातील 81 प्रभागासाठी प्रत्येकी 3 नगरसेवकांचा एक असे 27 प्रभाग निश्चित करण्यात आले. प्रभाग रचना जाहीर करून आरक्षण सोडतही काढण्यात आली. परंतु पुन्हा निवडणूक प्रक्रियेला स्थगिती देण्यात आली.

महाविकास आघाडी सरकारने 2011 नंतर जनगणना झाली नसल्याने अंदाजित लोकसंख्या गृहीत धरून सदस्य संख्या वाढविण्याचा निर्णय घेतला. 30 नोव्हेंबर 2021 रोजी अध्यादेश काढला. त्यानुसार महापालिकेतील नगरसेवकांची संख्या 92 करण्यात आली. तसेच बहुसदस्य प्रभाग रचनेनुसार प्रत्येकी तीन नगरसेवकांचे 30 वॉर्ड आणि दोन नगरसेवकांचा एक असे 31 वॉर्ड करण्यात आले. यानुसार प्रभाग रचना निश्चित करून आरक्षण सोडत काढून मतदार याद्या जाहीर केल्या आहेत. त्यासंदर्भातील अहवाल राज्य निवडणूक आयोग आणि राज्य शासनाला त्याचवेळी पाठविला आहे.

गेल्या चार वर्षापासून इच्छुक उमेदवार तयारीला लागले होते. तीनवेळा निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आल्याने इच्छुकांनी चांगली तयारी केली. तरुण मंडळे, तालीम-संस्थांच्या कार्यकर्त्यांशी संपर्क ठेवला आहे. एकदाची निवडणूक होऊन जाऊ दे… असा सूर इच्छुकांतून उमटू लागला आहे.

Back to top button