राष्ट्रीय महामार्ग रोखल्याने वाहतूक ठप्प; शिवसेनेतर्फे रॅली | पुढारी

राष्ट्रीय महामार्ग रोखल्याने वाहतूक ठप्प; शिवसेनेतर्फे रॅली

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

लखीमपूर खिरी येथे झालेल्या शेतकरी आंदोलकांवरील अत्याचाराविरोधात महाविकास आघाडीने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदच्या पार्श्‍वभूमीवर शिवसेनेने सोमवारी पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी करीत केलेल्या या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली. आक्रमक झालेल्या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेऊन सोडून दिले.

दरम्यान, शिवसेनेचा अंत पाहू नका, असा केंद्र सरकारला इशारा देत; शिवसेना शेतकर्‍यांच्या पाठीशी ठामपणे राहील, अशी ग्वाही आंदोलकांनी दिली.

महाविकास आघाडीने सोमवारी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. शिवसेनेने पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर तावडे हॉटेल परिसरात रास्ता रोको आंदोलनाचा इशारा दिला होता. सोमवारी सकाळी आठ वाजण्यापूर्वीच तावडे हॉटेल परिसर आंदोलकांनी फुलून गेला. तावडे हॉटेल येथून मोर्चाने घोषणाबाजी करून शिवसैनिक महामार्गावर पोहोचले. महामार्गावर ठिय्या मारून घोषणाबाजी सुरू केली. ‘केंद्र सरकारचा धिक्‍कार असो’, ‘शेतकर्‍यांना न्याय मिळालाच पाहिजे’, ‘काळे कायदे रद्द करा’ आदी घोषणांनी परिसर दणाणून गेला.

शिवसैनिकांनी महामार्गावर ठाण मांडल्याने वाहतूक ठप्प झाली. महामार्गाच्या दोन्ही बाजूस वाहनांच्या रांगा लागल्या. घोषणाबाजी सुरू असतानाच पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेण्यास सुरुवात केली. आंदोलक ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. मात्र, पोलिसांनी सर्वांना ताब्यात घेऊन गांधीनगर पोलिस ठाण्यात आणले. पोलिस उपअधीक्षक प्रिया पाटील, पोलिस निरीक्षक तानाजी सावंत, सहायक पोलिस निरीक्षक सत्यजित घुले यांनी आंदोलकांना शांत करण्याचा प्रयत्न केला. बंदसाठी कायदा हातात घेऊ नका, असे आवाहन केले. बंद हा प्रतिष्ठेचा विषय नसून, उत्तर प्रदेशातील घटनेचा निषेध नोंदविण्याचा प्रयत्न असल्याचे आंदोलकांनी स्पष्ट केले. त्यामुळे कुठेही बळजबरी न करता विनंती करणार असल्याचे आंदोलकांनी सांगितले.

शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात सुजित चव्हाण, शिवाजी जाधव, राजू यादव, विशाल देवकुळे, स्मिता सावंत, मंजित माने, संजय जाधव, विराज पाटील, अवधूत साळोखे यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

शहर शिवसेनेतर्फे रॅली

महाविकास आघाडीने पुकारलेल्या बंदच्या पार्श्‍वभूमीवर शहर शिवसेनेतर्फे दुचाकी रॅलीचे नियोजन करण्यात आले होते. रॅलीसाठी कार्यकर्ते सकाळपासूनच तयारी करीत होते.

‘जय भवानी, जय शिवाजी’चा जयघोष करत राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील विविध मार्गांवरून मोटारसायकल रॅली काढण्यात आली. यावेळी ऋतुराज क्षीरसागर, शिवसेना शहरप्रमुख जयवंत हारुगले, रविकिरण इंगवले, महेश उत्तुरे, रमेश खाडे, सुनील जाधव, रघुनाथ टिपुगडे व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

रॅली शनिवार पेठ, बुधवार पेठ, गंगावेस, शिवाजी पेठ, राजारामपुरी, लक्ष्मीपुरी आदी मार्गांवरून नेण्यात आली.

Back to top button