सतेज पाटील जिल्ह्याच्या विकासाला लागलेला शाप :  धनंजय महाडिक | पुढारी

सतेज पाटील जिल्ह्याच्या विकासाला लागलेला शाप :  धनंजय महाडिक

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा :  राजाराम कारखान्याला एक टनही ऊस न घालणार्‍या सतेज पाटील यांना कारखान्यावर बोलण्याचा अधिकार नाही. केवळ सूडबुद्धीने महाडिक यांना प्रत्येक ठिकाणी विरोध करणारे सतेज पाटील हे जिल्ह्याच्या विकासाला लागलेला शाप असल्याचा घणाघात खासदार धनंजय महाडिक यांनी केला. वडणगे (ता. करवीर) येथील पार्वती मंदिराच्या आवारात छत्रपती राजर्षी राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा राजर्षी शाहू आघाडीच्या (महाडिक पॅनेल) प्रचार शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते.

कोल्हापूरसाठी काय केले?

सतत 96 कुळी पाटील असल्याची टिमकी वाजवणारे सतेज पाटील हे मनोरुग्ण आहेत. कोल्हापूरची थेट पाईपलाईन झाली नाही तर निवडणूक लढवणार नाही असे ते सांगत होते; मात्र त्यानंतर त्यांनी चार वेळा निवडणूक लढवली. सतेज पाटील यांनी दोन वेळा मंत्री असताना कोल्हापूरसाठी काय केले? ते सांगावे, असा सवाल महाडिक यांनी केला.

एका रात्रीत डी. वाय. पाटील साखर कारखान्याचे साडेपाच हजार सभासद कमी करणार्‍या सतेज पाटील यांनी सहकार वाचवण्याची भाषा करू नये. शेती महामंडळाची सुमारे पाचशे ते सहाशे एकर जमीन त्यांनी डी. वाय. पाटील ग्रुपच्या घशात घातली. या जमिनीतील ऊस स्वतःच्या कुटुंबीयांच्या नावावर घालून, जमीन कसणार्‍या शेतकर्‍यांकडून लाखो रुपये उकळणारे सतेज पाटील शासनाकडे नाममात्र शुल्क भरतात, असा आरोपही धनंजय महाडिक यांनी केला.

Back to top button