शेतीसाठी पाणी उपशावर मर्यादा; पिण्याच्या पाण्यासाठी सरकारचा निर्णय | पुढारी

शेतीसाठी पाणी उपशावर मर्यादा; पिण्याच्या पाण्यासाठी सरकारचा निर्णय

कोल्हापूर; सुनील सकटे :  वाढत्या तापमानाचा धरणातील पाणी साठ्यावर परिणाम होत आहे. पिण्यासाठी पाणी उपलब्ध होण्याकरिता जिल्ह्यात शेतीच्या पाणी उपशावर बंदी घालण्यात आली आहे. पाटबंधारे विभागाने हा निर्णय घेतला आहे. 18 एप्रिलपासून उपसाबंदीची अंमलबजावणी होणार आहे.

गेल्या काही दिवसांत तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. तापमानामुळे धरणातील पाण्याचे मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन होत आहे. अशातच यंदाचा पावसाळा लांबण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. वाढते बाष्पीभवन आणि पाऊस लांबण्याची शक्यता या पार्श्वभूमीवर पाटबंधारे विभागाची धरणातील पाण्याचे नियोजन करण्याची तारेवरील कसरत सुरू आहे. पाऊस लांबल्यास पिण्याची पाण्याची चणचण भासू नये याची खबरदारी पाटबंधारे विभागाने घेतली आहे. त्यासंदर्भात नियोजनही केले आहे. प्रथम शेतीच्या पाणी वापरावर मर्यादा आणली आहे. भोगावती, पंचगंगा या नद्यांवर पाणी उपसाबंदी केली आहे.

राधानगरी धरणात सध्या 3.25 टीएमसी पाणी आहे. गेल्यावर्षी यादिवशी धरणात 4.04 टीएमसी पाणीसाठा होता. गेल्यावर्षीच्या तुलनेत पाणीसाठ्यात एक टीएमसीने घट झाली आहे. तुळशी धरणात 1.61 टीएमसी पाणीसाठा असून गतवर्षी 2.09 टीएमसी, वारणा धरणात 14.62 टीएमसी तर गतवर्षी 11.88 टीएमसी, दूधगंगा धरणात 6.13 टीएमसी व गतवर्षी 11.96 टीएमसी, कासारी 1.13 व गतवर्षी 1.15 टीएमसी, कडवी 1.31 टीएमसी व गतवर्षी 1.5 कुंभी 1.53 टीएमसी व गतवर्षी 1.90 टीएमसी, पाटगाव 1.53 टीएमसी व गतवर्षी 1.93 टीएमसी पाणी साठा शिल्लक आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा राधानगरी आणि दूधगंगा धरणातील पाणीसाठ्यात चांगलीच घट झाली आहे. त्यामुळे पाऊस लांबल्यास पिण्याच्या पाण्याची गैरसोय होऊ नये यासाठी खबरदारी म्हणून उपसाबंदी केली आहे.

भोगावती नदीवर राधानगरी धरण शिंगणापूर बंधार्‍यावरील बाजू या परिसरात 18 ते 20 एप्रिल या कालावधीत
दोन दिवस उपसाबंदी लागू राहील; तर पंचगंगा नदीवरील शिंगणापूर बंधारा ते शिरोळ बंधारा या परिसरात 21 ते 23 एप्रिल या कालाधीत तीन दिवस पाणी उपसाबंदी लागू असेल.

याबरोबरच दूधगंगा नदीवरील धरणस्थळ ते बिद्रीपर्यंत 23 ते 25 एप्रिल, दूधगंगा उजवा मुख्य कालव्यावर लिंगाचीवाडी ते बिद्री कालवा दुभाजक या परिसरात 23 ते 27 एप्रिल या कालावधीत आणि दूधगंगा नदीवर बिद्री ते दत्तवाड बंधारा या परिसरात 26 ते 28 एप्रिल या कालावधीत उपसाबंदी केली आहे.

Back to top button