भारतीय औषध उद्योगाचे अर्थकारण पूर्वपदावर! | पुढारी

भारतीय औषध उद्योगाचे अर्थकारण पूर्वपदावर!

कोल्हापूर; राजेंद्र जोशी : कोरोना काळामध्ये अर्थकारण घसरलेला भारतीय औषध उद्योग आता पूर्वपदावर आला आहे. 2022-23 या आर्थिक वर्षात औषध उद्योगाने 9.3 टक्क्यांची वार्षिक व्यवसाय वृद्धी हस्तगत केल्याचे चित्र पुढे आले आहे.

भारतीय औषध उद्योगाचे देशांतर्गत आकारमान सुमारे दीड लाख कोटी रुपयांचे आहे. कोरोनामध्ये काही अत्यावश्यक औषधांचा बाजार वगळता आरोग्य विज्ञानाच्या अन्य शाखा ठप्प झाल्यामुळे उद्योगाची वार्षिक वाढ अवघ्या 2.2 टक्क्यांवर आली होती. कोरोनाचे सावट दूर झाल्यानंतर कोरोनातील व्यवसायाच्या कमी पायामुळे 2021-22 मध्ये व्यवसायाची वार्षिक वाढ 14.7 टक्क्यांवर आल्याचे चित्र होते. पण आता भक्कम पायावर 9.3 टक्क्यांची वाढ नोंदविली गेल्याने या उद्योगाचा गाडा रुळावर आल्याचे मानले जाते आहे. मार्च 2023 मध्ये हा व्यवसाय सरासरी 13 टक्क्यांनी वाढला. यामध्ये विषाणूविरोधी औषधांच्या विक्रीमध्ये 32.4 टक्क्यांची श्वसनसंस्थेच्या विकारावरील औषधांत 49.7 टक्क्यांची आणि वेदनाशामक औषधांच्या विक्रीत 17.9 टक्क्यांची भक्कम वाढ नोंदविली गेली.

या वाढीमध्ये मॅनकाईंड या कंपनीची सर्वाधिक 16.6 टक्क्यांची वाढ आहे. अ‍ॅबॉट या बहुराष्ट्रीय कंपनीची 11.8 टक्के, गुजरातस्थित झायडस कॅडिलाची 10.7 टक्क्यांची वाढ नोंदविली गेली, तर भारतातील सर्वात मोठे औषध उद्योेग म्हणून ओळखले जाणारे सनफार्मा आणि सिप्ला या कंपनीची वाढ अनुक्रमे 9.3 टक्के आणि 8.3 टक्के इतकी आहे.

नेत्ररोगआणि त्वचारोगाच्या औषधांच्या विक्रीत वाढ

औषधांच्या ब—ँडमध्ये मॅनकाईंडच्या मॅनफोर्सने सर्वाधिक 63.8 टक्क्यांची वाढ घेतली आहे. त्याखालोखाल ग्लॅक्सो स्मितकाईनच्या ऑगमॅन्टिन आणि सिप्लाच्या फोराकॉर्टची अनुक्रमे 63.8 आणि 27.8 टक्क्यांची वाढ झाली आहे. 2022-23 या आर्थिक वर्षांत कोरोना उतरणीला लागल्यानंतर नेत्रचिकित्सामध्ये सर्वाधिक 20 टक्क्यांची वाढ नोंदविली गेली. मूत्ररोगशास्त्र आणि त्वचारोग शास्त्रामध्ये अनुक्रमे 15.9 आणि 15.5 टक्क्यांची वाढ आहे. श्वसनसंबंधीच्या औषधांमध्ये 12.7 टक्क्यांची एकत्रित वाढ आहे, तर औषध विक्रीच्या यादीत अग्रभागी असलेल्या हृदयरोग आणि मधुमेहावरील उपचारांमध्ये अनुक्रमे 9.8 आणि 5.9 टक्क्यांची वाढ आहे.

Back to top button