‘सोलर रूफ टॉप’मधून 475 घरगुती ग्राहकांचे वीज बिल शून्य! | पुढारी

‘सोलर रूफ टॉप’मधून 475 घरगुती ग्राहकांचे वीज बिल शून्य!

कोल्हापूर; सुनील सकटे :  शाश्वत व स्वच्छ ऊर्जेसाठी भक्कम पर्याय असणार्‍या सौरऊर्जेतून कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांतील घरगुती ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात सवलती घेतल्या आहेत. सौरछतासाठी केंद्र सरकारच्या अनुदान योजनेतून 475 घरगुती वीज ग्राहकांनी 1 हजार 754 किलोवॅट क्षमतेची सौरछत यंत्रणा बसविली आहे. 618 वीज ग्राहकांच्या (2 हजार 95 किलोवॅट) अर्जावर प्रक्रिया सुरू आहे.

केंद्रीय नवीन व नवीकरणीय ऊर्जा विभागाच्या योजनेतून घरगुती ग्राहकांना1 ते 3 किलोवॅटपर्यंत सौरछत संचास 40 टक्के, तर 4 ते 10 किलोवॅटपर्यंत 20 टक्के अनुदान आहे. सामूहिक वापरासाठी 500 किलोवॅटपर्यं; मात्र प्रत्येक घरासाठी 10 किलोवॅट मर्यादेत समूह गृहनिर्माण संस्था व निवासी कल्याणकारी संघटना ग्राहकांना 20 टक्के अनुदान मिळते. सौरछत संच अनुदानासाठी प्रतिकिलोवॅटप्रमाणे संचाचे मूलभूत दर पुढीलप्रमाणे निश्चित केले आहेत. 1 ते 3 किलोवॅटकरिता 41,400 रुपये, 3 पेक्षा अधिक ते 10 किलोवॅटकरिता 39,600 रुपये, 10 ते 100 किलोवॅटकरिता 37,000 रुपये, तर 100 ते 500 किलोवॅटकरिता 35,886 रुपये दर आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील 328 घरगुती वीज ग्राहकांनी 1,261 किलोवॅट, तर सांगली जिल्ह्यातील 147 ग्राहकांनी 493 किलोवॅट क्षमतेची सौरछत यंत्रणा बसविली आहे. या योजनेची संपूर्ण माहिती व ऑनलाईन अर्जाची सोय, मार्गदर्शक तत्त्वे, एजन्सी निवडसूची, शंका-समाधान यासाठी महावितरणच्या पुढील अधिकृत संकेतस्थळावर https:/// www. mahadiscom. in/ ismart  संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

  • 1 किलोवॅट क्षमतेची सोलर रूफ टॉप यंत्रणेसाठी 108 स्क्वेअर फूट जिथे सावली पडणार नाही, अशी जागा आवश्यक आहे.
  •  1 किलोवॅट क्षमतेच्या सोलर रूफ टॉपमधून वार्षिक सरासरीनुसार महिन्याला 120 युनिट वीजनिर्मिती होते.
  •  बाजारभावानुसार 1 किलोवॅट क्षमतेच्या सोलर रूफ टॉप यंत्रणेसाठी 50 ते 55 हजार रुपयांदरम्यान खर्च येतो. 1 किलोवॅटसाठी 41,400 रुपये या मूलभूत निर्धारित दरावर घरगुती ग्राहकांना केंद्र सरकारमार्फत 40 टक्के अनुदान मिळते.
  •  मासिक वीज बिलात बचत होऊन सोलर रूफ टॉपसाठी गुंतविलेल्या रकमेची 4 ते 5 वर्षात परतफेड मिळते.

विनाअनुदानित सौरछत यंत्रणा

विनाअनुदानित सौरछत यंत्रणा कोल्हापूर जिल्ह्यातील 2 हजार 704 व सांगली जिल्ह्यातील 1 हजार 519 विविध वर्गवारीतील ग्राहकांनी बसविली आहे. त्या सौरछत यंत्रणेची आस्थापित क्षमता अनुक्रमे 50 हजार 825 किलोवॅट व 27 हजार 878 किलोवॅट आहे. वीज ग्राहक दरमहा सौरऊर्जेद्वारे
1 कोटी युनिटपेक्षा अधिक वीजनिर्मिती करीत आहेत.

Back to top button