प्राध्यापकांना दिलासा, महाविद्यालयांमधील तासिका आता ६० मिनिटांची! | पुढारी

प्राध्यापकांना दिलासा, महाविद्यालयांमधील तासिका आता ६० मिनिटांची!

कोल्हापूर, प्रवीण मस्के : शासकीय अनुदानित महाविद्यालये व शैक्षणिक संस्थांमधील अध्यापन तासिका कालावधी 60 मिनिटांचा करण्याचा निर्णय उच्च व तंत्रशिक्षण विभागाने घेतला असून, तसा आदेश जारी केला आहे. त्यामुळे तास आणि तासिकेचा घोळ आता संपला असून, प्राध्यापकांना दिलासा मिळाला आहे.

उच्चशिक्षण विभागाच्या अखत्यारित असणार्‍या शासकीय महाविद्यालये, अनुदानित महाविद्यालयांमध्ये पदवी, पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांसाठी नियुक्त तासिका तत्त्वावरील अध्यापकांची मानधनवाढ आणि तासिकेचा घोळ मिटविण्याची बर्‍याच वर्षांपासून मागणी प्रलंबित होती. उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी हिवाळी अधिवेशनात तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांच्या मानधनवाढीची घोषणा केली. 27 मार्च रोजी यासंदर्भातील आदेश काढला आहे.

तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांचे मानधन 900 रुपये केले आहे. त्याचबरोबर महाविद्यालयांमधील तासिका आता 60 मिनिटांची करण्यास मान्यता दिली आहे. सध्या विद्यापीठ आणि महाविद्यालयांमध्ये 48 मिनिटांचा तास आहे, त्याप्रमाणे तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांना मानधन दिले जाते. आगामी शैक्षणिक वर्षापासून 60 मिनिटांचा तास याची अंमलबजावणी केल्यास नॅशनल क्रेडिट फ्रेमवर्कच्या अनुषंगाने क्रेडिटसाठी आवश्यक अध्यापनाचे वेळापत्रक करणे सोयीचे होणार आहे. मात्र, नॅशनल क्रेडिट फ्रेमवर्कची अंमलबजावणी होईपर्यंत विद्यापीठांना सध्याचा तासिका कालावधी सुरू ठेवण्याची मुभा राहील, असे शासन आदेशात नमूद केले आहे.

Back to top button