‘आयुष’च्या आयुष्याची दोरी बळकट | पुढारी

‘आयुष’च्या आयुष्याची दोरी बळकट

चंदगड; पुढारी वृत्तसेवा :  आयुष्याची दोरी बळकट असेल तर मृत्यू दारातून परत जातो, याचे ज्वलंत आणि थरकाप उडवणारे उदाहरण चंदगड तालुक्यातील पाटणे फाटा कार्वे येथे पहावयास मिळाले. सुमारे शंभर फूट खोल असलेल्या विहिरीत 25 फूट पाणी आहे. याच घरालगत असणार्‍या विहिरीत आयुष अनंत तुपारे (वय 3) तोल जाऊन पडला आणि त्याच्या इतर सवंगडी मित्रांनी आरडा-ओरडा केला.

जवळच असलेल्या एक इमारतीत राहुल कातकर (वय 40, रा. आंबेवाडी, ता. जि. बेळगाव) हा सेंट्रिगचे काम करीत होता. त्याच्या कानावर आवाज पडताच त्याने क्षणाचाही विलंब न लावता दोराच्या साहाय्याने विहिरीत उतरला. आयुष दिसत नव्हता. इतक्यात गटांगळ्या खात आयुष पाण्यावर हात बडवू लागला. त्याला अलगद मिठीत घेतले. आणि दोरखंडाच्या साहाय्याने दोघेही 50 फुटापर्यंत आले आणि दोरखंड तुटला. दोघेही पुन्हा विहिरीत कोसळले आणि दोघेही बुडाले. सर्वांचा पुन्हा थरकाप उडाला. काय होणार? असा घरच्यांना प्रश्न पडला आणि दोघेही पाण्यावर दिसू लागले.

दरम्यान, बघ्यांची गर्दी वाढली. गर्दीतील राहुल कांबळे (रा. जंगमहट्टी ता. चंदगड) विहिरीत उतरला अन् बाळाला घेऊन वर आला. त्यानंतर गंभीर जखमी झालेल्या राहुल कातकर वर आला. विहिरीत घाई गडबडीत उतरताना त्याच्या हाता-पायाला, शरीरावर जखमा झाल्या होत्या. त्याचा मोबाईल पाण्यात पडला. आयुषच्या वडिलांनी त्याला तत्काळ नवीन मोबाईल दिला. मात्र, त्याने तो नाकारला. मोबाईल अनेक घेता येतील; पण बालकाचा जीव परत मिळवता आला नसता, अशी प्रतिक्रिया कातकर याने दिली. मोलमजुरी करून खाणार्‍या कातकर याला अनेकांनी बक्षीस देऊ केले. पण त्याने ते नम्रपणे नाकारले.

संबंधित बातम्या
Back to top button