कोल्हापूर : दिवसभराच्या उष्म्यानंतर शाहूवाडीत वादळी पाऊस | पुढारी

कोल्हापूर : दिवसभराच्या उष्म्यानंतर शाहूवाडीत वादळी पाऊस

विशाळगड : पुढारी वृत्तसेवा : वाढलेल्या उष्म्याने अंगाची लाही-लाही होत असताना आभाळाकडे डोळे लावून बसलेल्या शाहूवाडीकरांना आज (दि. ७) पावसाने दिलासा दिला. परंतु त्यात जोर नव्हता. पाऊस पडला नाही, तर नुसताच ‘शिताडल्या’चा अनुभव आला. काही भागांत मात्र जोरदार सरी कोसळल्या.

आज दिवसभराच्या असह्य उष्म्यानंतर सायंकाळी ५ च्या सुमारास शाहूवाडी व विशाळगड परिसरात जोरदार पावसाला अचानक सुरुवात झाली. चार वाजेपर्यंत कोणी पावसाची कल्पनाही केली नव्हती. दुपारपर्यंत तापमान अधिकच वाढल्याने हवेत अधिकच उष्णता जाणवत होती. दुपारी दोननंतर आकाशात अचानकच काळ्याकभिन्न ढगांची गर्दी झाली. सुरुवातीला हलक्या सरी कोसळल्या. सायंकाळी पाचनंतर विजांच्या कडकडाटासह तुफानी पाऊस पडला. यामुळे गृहिणी, शेती कामात व्यस्त शेतकरी व वाहनधारकांची चांगलीच तारांबळ उडाली. सोसाट्याचा वारा सुटल्याने वीज पुरवठा खंडित करण्यात आला. अल्पकाळानंतर पाऊस व वाऱ्याचा वेग मंदावल्याने शाहूवाडीकर मात्र आता विद्युत पुरवठा सुरळीत होण्याच्या प्रतीक्षेत आहेत.

आज दिवसभरही कमालीचा उष्मा होता. अंग भाजून निघत होते. सायंकाळी पाचच्या सुमारास एकदमच पावसाळी वातावरण झाले. आकाशात काळे ढग दाटून आले. वारे जोराने वाहू लागले. त्यामुळे धुळीचे लोट उसळले. लोकांची तारांबळ उडाली. रस्त्यांवरील विक्रेत्यांची सामान हलविताना धांदल उडाली. पाऊस आला आला असे म्हणेपर्यंत टप-टप थेंब पडू लागले. वादळी वारेही तितक्याच जोराने वाहत असल्याने पावसाचा जोर कमी झाला. तरीही सुमारे वीस मिनिटांहून अधिक काळ पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. मातीचा गंध मन आबादानी करून गेला.

हेही वाचा 

Back to top button