कोल्हापूर : बाळूमामा देवालयाची सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न | पुढारी

कोल्हापूर : बाळूमामा देवालयाची सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न

मुदाळतिट्टा; पुढारी वृत्तसेवा : श्री. क्षेत्र आदमापूर (ता. भुदरगड ) येथील बाळूमामा देवालय समितीची मासिक सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. शुक्रवार (दिनांक ७) रोजी नुतन कार्याध्यक्ष धैर्यशीलराजे भोसले यांनी ही सभा बोलावली होती. ११ वाजता बोलवण्यात आलेल्या या सभेसाठी कोरम पुर्ण न झाल्याने त्यानंतर एक तासाने सभा घेण्यात आली. या सभेसाठी आठ सदस्य उपस्थित होते. सभेमध्ये जे विषय होते ते सर्व विषय मंजूर करण्यात आले आहेत. बाळूमामा देवालयाच्या मुख्य कार्यालय सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या या सभेच्या अध्यक्षस्थानी कार्याध्यक्ष धैर्यशीलराजे भोसले हे होते.

प्रारंभी विषय पत्रिकेचे वाचन मॅनेजर मारुती कदम यांनी केले. विषय पत्रिकेवरील मागील सभेचे प्रोसिडिंग वाचून कायम करणे या विषयावर सविस्तर चर्चा झाली व सर्वानुमते मंजूर करण्यात आले. आर्थिक व्यवहारासंदर्भात करावयाच्या चर्चेच्या विषयामध्ये सह्यांचे अधिकार कार्याध्यक्ष, सचिव व खजिनदार या तिघांना देण्यात आले असून कार्याध्यक्ष यांच्या व्यतिरिक्त दोघांपैकी एकाची सही घेऊन आर्थिक व्यवहार करावेत असा निर्णय घेण्यात आला. हा विषय संभाजी पाटील यांनी मांडला त्यास यशवंतराव पाटील यांनी अनुमोदन दिले.

खजिनदार निवडी संदर्भात झालेल्या चर्चेत दत्तात्रय तुकाराम पाटील यांची खजिनदार म्हणून नेमणूक करावी असे मत दिनकरराव कांबळे यांनी व्यक्त केले. त्यास दिलीप पाटील यांनी अनुमोदन दिले. माहे फेब्रुवारी २३ च्या जमाखर्चास व अंदाज पत्रकास मंजुरी देणे या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली. चर्चेअंती सदस्य इंद्रजीत खर्डेकर, संदीप मगदूम यांनी या विषयाला मंजुरी द्यावी असा ठराव मांडला. त्या सभागृहाने मंजुरी दिली. या सभेला दत्तात्रय पाटील, दिनकरराव कांबळे, यशवंतराव पाटील, संदीप राव मगदूम, इंद्रजीत खर्डेकर, संभाजी पाटील, दिलीप पाटील हजर होते. सभा शांततेत व खेळीमेळीत संपन्न झाल्याबद्दल कार्याध्यक्ष धैर्यशील भोसले यांनी सर्वांचे आभार मानले.

दरम्यान सभेनंतर उपस्थित ग्रामस्थ व भक्त यांचे आभार मानून सर्व सदस्यांना विश्वासात घेऊन आपण इथून पुढे काम करत राहू आपल्याला सर्वांनी आजपर्यंत जसे सहकार्य केले आहे. तसेच यापुढेही सहकार्य करावे. बाळूमामाच्या भक्तांना सर्व सेवासुविधा उपलब्ध करून देण्यासाठी अविरत कष्टात राहून बाळूमामाच्या विश्वासात पात्र राहावे, सर्वांनी शांततेचे सहकार्य करावे असे आवाहन कार्याध्यक्ष धैर्यशील भोसले यांनी केले.

सभेकडे सर्वांच्या नजरा…

कोल्हापूर येथे झालेल्या बाळुमामा ट्रस्टींच्या वादाच्या पार्श्वभूमीवर आजची सभा कशी होणार? याकडे सर्वांच्या नजरा लागून राहिल्या होत्या. आजच्या सभेकडे गावचे ट्रस्टी सोडून बाहेरचे सदस्य गैरहजर राहिले. त्यामुळे आगामी काळात काय होणार? याबाबत लक्ष लागून राहिले आहे. आजच्या सभेला पदसिद्ध सदस्य असणारे पोलीस पाटील माधुरी लक्ष्मण पाटील गैरहजर होत्या. आदमापूर येथील पोलीस पाटीलपद रिक्त असल्यामुळे या पदाचा कार्यभार मुद्दाळ येथील पोलीस पाटलांकडे देण्यात आला आहे. त्या दोन्ही गटाकडे सभेसाठी गेल्या नाहीत. त्यानी अलिप्तपणा स्वीकारला आहे. त्याची चर्चा या ठिकाणी होती. सभेसाठी पोलीस बंदोबस्त होता.

हेही वाचा : 

Back to top button