कोल्हापूर : ‘शिवपुत्र संभाजी’ महानाट्य आजपासून | पुढारी

कोल्हापूर : ‘शिवपुत्र संभाजी’ महानाट्य आजपासून

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : जगदंब क्रिएशन निर्मित आणि डॉ. अमोल कोल्हे यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘शिवपुत्र संभाजी’ या महानाट्याचे प्रयोग कोल्हापुरात कळंबा रोडवरील तपोवन मैदानात शुक्रवार (दि. 7) पासून सुरू होत आहे. प्रयोगांसाठीची तयारी पूर्ण झाली असून महानाट्याच्या संपूर्ण टीमने आज चारमजली भव्य खुल्या रंगमंचावर महानाट्याची रंगीत तालीम केली. महानाट्याच्या तिकीट विक्रीला कोल्हापूरकरांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे.

‘शिवपुत्र संभाजी’ महानाट्य पाहायला यायलाच लागतंय, हर हर महादेव अशा घोषणा देत डॉ. अमोल कोल्हे यांच्यासोबत सर्व कलाकारांनी कोल्हापूरकरांना महानाट्य पाहण्यासाठी आमंत्रित केले. 12 एप्रिलपर्यंत रोज सायंकाळी 6 वाजता प्रयोग होणार आहेत.

तपोवन मैदानात उभारण्यात येत असलेल्या भव्य चार मजली सेटचे काम पूर्ण झाले आहे. सर्व कलाकारांना डॉ. कोल्हे यांनी सादरीकरणापूर्वीच्या सूचना देऊन कलाकारांना प्रोत्साहन दिले. या महानाट्यात ज्येष्ठ अभिनेते डॉ. गिरीश ओक बादशाह औरंगजेबाच्या भूमिकेत, अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड महाराणी येसुबाईंच्या, महेश कोकाटे अनाजी पंतांच्या, रमेश रोकडे सरसेनापती हंबीररावांच्या, अजय तापकिरे कवी कलशाच्या, तर विश्वजित फडते दिलेरखान व मुकर्रबखानच्या दुहेरी भूमिकेत पहायला मिळणार आहेत. तिकीट विक्री केशवराव भोसले नाट्यगृह, हॉटेल विश्व शाहूपुरी पहिली गल्ली, कुलकर्णी आयुर्वेद शहाजी लॉ कॉलेजसमोर, राजारामपुरी आणि हॉटेल दामिनी, ताराबाई पार्क आणि तपोवन मैदान, कळंबा रोड येथे सुरू आहे. ‘बुक माय शो’वर देखील तिकिटे उपलब्ध आहेत.

Back to top button