कोल्हापूर : तारदाळला भरधाव टेम्पोच्या धडकेत बालक ठार | पुढारी

कोल्हापूर : तारदाळला भरधाव टेम्पोच्या धडकेत बालक ठार

तारदाळ; पुढारी वृत्तसेवा :  तारदाळ-खोतवाडी रस्त्यावर जावईवाडी चौकात नांदणीकडे जाणार्‍या भरधाव टेम्पो (क्र. एम.एच. 09 एफ.एन. 5021) ने यश शीतल पुजारी (वय 5, रा. जावईवाडी) या खेळणार्‍या बालकाला धडक दिल्याने तो गंभीर जखमी झाला. त्याला उपचारांसाठी तातडीने सांगली सिव्हिल इस्पितळात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला.

बुधवारी सकाळी 10 च्या सुमारास जावईवाडी चौकातील साळुंखे यांच्या घरासमोर यश पुजारी व आणखी दोन मुले खेळत होती. चेंडू रस्त्यावर आल्यानंतर तो पकडण्यासाठी यश धावला. दरम्यान, मुख्य रस्त्यावर भरधाव येणार्‍या मालवाहतूक टेम्पोने त्याला जोराची धडक दिल्याने त्याच्या डोक्याला जबर मार लागला. त्यामुळे यश जागीच कोसळला. नागरिकांनी तातडीने त्याला उपचारांसाठी सांगली सिव्हिल इस्पितळ येथे दाखल केले. परंतु, उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. ही घटना आई-वडिलांना समजताच त्यांनी मोठा आक्रोश केला. या घटनेने परिसरावर शोककळा पसरली आहे.

पुजारी दाम्पत्यास यश हा एकच मुलगा होता. त्याच्या अपघाती निधनाने पुजारी कुटुंबीयांवर झालेल्या आघाताने हळहळ व्यक्त होत आहे. घटनेची नोंद रात्री उशिरा शहापूर पोलिस ठाण्यात झाली आहे.

Back to top button