लसीकरण : कोल्हापूरकरांची लसीकरणाकडे पाठ ! | पुढारी

लसीकरण : कोल्हापूरकरांची लसीकरणाकडे पाठ !

कोल्हापूर : राजेंद्र जोशी

लसीसाठी रांगेत गर्दी करणारे कोल्हापूरकर आता आळसावले आहेत. शासनाने लस मोठ्या प्रमाणात आणि तीही मोफत स्वरूपात उपलब्ध केली तरीही नागरिकांचे पाय लसीकरण केंद्रांकडे वळण्यास तयार नाहीत. यामुळे शासकीय यंत्रणेची मोठी दमछाक होत असून निर्धारित वेळेत जर लस घेतली नाही तर संबंधित नागरिकांच्या जीवावरची धोक्याची टांगती तलवार तर कायम आहे. नागरिकांनी लसीकरणाच्या मोहिमेत सहभागी होण्याची गरज आहे.

भारतात जानेवारीच्या उत्तरार्धात लसीचे आगमन झाले. प्रारंभी पुरेशा प्रमाणात लस उपलब्ध नसल्याने नागरिकांनी लसीकरण केंद्रांवर गर्दी केली, गोंधळ घातला. प्रसंगी आरोग्य कर्मचार्‍यांवर हल्लेही केले. यानंतर खासगी दवाखान्यांमध्ये पैसे देऊन लस घेण्याचा मार्ग खुला झाला. मात्र, आर्थिक कारणावरून नागरिकांनी खासगी दवाखान्याकडेही पाठ फिरवली. आता गेल्या काही महिन्यांपासून सरकारने लस मोफत केली आहे. ती देण्यासाठी ठिकठिकाणी सुविधा उपलब्ध केल्या आहेत. त्याहीपेक्षा घरोघरी जाऊन नागरिकांना लस घेण्याविषयी विनवण्याही केल्या जात आहेत. परंतु, प्रत्यक्षात कोल्हापुरात याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत नाही, असे शासकीय यंत्रणेचे दुखणे आहे. कोरोनाची महामारी अद्याप संपलेली नाही. लस न घेणार्‍या नागरिकांनी सार्वजनिक जबाबदारीतून ही लस घेतली नाही तर केव्हाही कोरोनाच्या संसर्गाचा पुन्हा उद्रेक होऊ शकतो.

जिल्ह्यामध्ये 18 वर्षांखालील मुले वगळता लस घेणार्‍या पात्र नागरिकांची संख्या 30,14,400 इतकी आहे. यापैकी 23,48,633 नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे, तर दोन्ही डोस घेणार्‍या नागरिकांची संख्या 9,49,016 इतकी आहे. लसीकरणाच्या प्रक्रियेत प्रारंभी कोल्हापूर हा राज्यात आघाडीवरचा जिल्हा होता. कोरोनाची दुसरी लाट दीर्घ काळ सक्रिय राहिल्याने नागरिकांनी गतीने लसीकरण प्रक्रियेत भाग घेतला; पण जसजसे लॉकडाऊन उठले, संसर्गाची धग कमी झाली, तसतसे भीती पळाली आणि लसीकरणाकडेही नागरिकांनी पाठ फिरवली. याचा परिणाम म्हणून दुसरा डोस न घेतलेल्या नागरिकांची संख्या 2 लाख 3 हजारांवर जाऊन पोहोचली आहे. यामध्ये सर्वात चिंताजनक बाब म्हणजे 1,07,865 ज्येष्ठ नागरिक आहेत तर 25,195 ज्येष्ठ नागरिकांनी अद्याप पहिलाही डोस घेतलेला नाही. या नागरिकांना लसीकरणासाठी उद्युक्त करण्याकरिता आता त्यांच्या सभोवतालची सार्वजनिक मंडळांचे कार्यकर्ते, राजकीय पक्षांचे प्रतिनिधी यांनी पुढाकार घेण्याची गरज आहे.

कोल्हापूर जिल्ह्याने कोरोना काळात लोकसंख्येच्या तुलनेत राज्यात सर्वाधिक माणसे गमावली आहेत. गेल्या दीड वर्षांत मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांची संख्या 6 हजारांच्या उंबरठ्यावर (5 हजार 784) येऊन ठेपली आहे. या जिल्ह्यामध्ये आरोग्याच्या दृष्टीने फार मोठ्या अत्याधुनिक सुविधा नाहीत. कोरोना काळात रुग्णांना वाचविण्यासाठी वैद्यकीय पथकांची आणि कुटुंबीयांची तारेवरची कसरत जिल्ह्याने पाहिली आहे. रेमडेसिवीर, टोसीलझुमॅब, फॅबीफ्ल्यू ही औषधे मिळविण्यासाठीही नागरिकांच्या तोंडाला फेस आला होता. वेळेत उपचार न मिळाल्याने अनेक नागरिक हाकनाक गेले. हा सर्व इतिहास ताजा असतानाही नागरिक लसीकरणाकडे पाठ फिरवत असतील, तर हे वागणं बरं नव्हं.

लसीकरणामुळे कोरोनापासून सुरक्षितता प्राप्त होते, हे सिद्ध झाले आहे. तिसर्‍या लाटेची शक्यता पाहता 100 टक्के नागरिक सुरक्षित असतील तरच आपले कुटुंब, गाव, जिल्हा सुरक्षित असणार आहे. यामुळे स्थानिक लोकप्रतिनिधी, संस्था यांनी सक्रिय सहभाग घेऊन आपले गाव कोरोनापासून सुरक्षित करून घेणे आवश्यक आहे. यासाठी आरोग्ययंत्रणा सज्ज आहे.
– डॉ. फारूख देसाई, जिल्हा कोरोना लसीकरणप्रमुख

Back to top button