कोल्हापूर : गोवा बनावटीचे 52 लाखांचे मद्य जप्त | पुढारी

कोल्हापूर : गोवा बनावटीचे 52 लाखांचे मद्य जप्त

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूर विभागाच्या भरारी पथकाने शुक्रवारी रात्री 67 लाख तीन हजार 200 रुपये किमतीचे गोवा बनावटीचे मद्य वाहनासह जप्त केले. याप्रकरणी सुरेश रामजीवन बिशनोई (वय 24, ढाणी धोरिमाना, जि. बारमेर, राजस्थान) याला अटक करण्यात आली.

राज्य उत्पादन शुल्कच्या भरारी पथकाला गोव्याहून बनावट दारू वाहनातून येत असल्याची माहिती मिळाल्यानंतर जिल्हा अधीक्षक रवींद्र आवळे व उपअधीक्षक राजाराम खोत यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथकाने सायंकाळपासून तावडे हॉटेल चौक परिसरात पाळत ठेवली. रात्री साडेदहाच्या सुमारास तावडे हॉटेल चौकात सर्व्हिस रोडवर आयशर कंटेनर (एमएच 08 एपी 5080) जात असताना त्याला थांबविण्यात आले. यावेळी चालकाकडे वाहनात भरलेल्या मालाविषयी चौकशी केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. त्यामुळे भरारी पथकाला संशय आल्याने त्यांनी माल दाखविण्यास सांगितले.

वाहनाची पाहणी केली असता त्यामध्ये गोवा राज्य निर्मित विदेशी मद्याचे बॉक्स आढळून आले. याप्रकरणी ताब्यात घेतलेल्या आरोपीव्यतिरिक्त अन्य व्यक्तींचा सहभाग आहे काय, याबाबतचा तपास सुरू आहे. आरोपीवर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला असुन अन्य आरोपीचा शोध सुरू असल्याचे राज्य उत्पादन शुल्क, कोल्हापूर भरारी पथकाचे निरीक्षक पी. आर. पाटील यांनी सांगितले. भरारी पथकात निरीक्षक पी. आर. पाटील यांच्यासह विजय नाईक, एस. एल. नलवडे, जवान सचिन काळेल, राजेंद्र कोळी, मारुती पोवार, जय शिनगारे यांचा समावेश होता.

Back to top button