कोल्हापूर: निढोरीत सायपनचे पाईप अधिकाऱ्यांनी फोडले; शेतकऱ्यांतून नाराजी | पुढारी

कोल्हापूर: निढोरीत सायपनचे पाईप अधिकाऱ्यांनी फोडले; शेतकऱ्यांतून नाराजी

मुदाळतिट्टा; पुढारी वृत्तसेवा : काळमावाडी पाटबंधारे प्रकल्पाच्या निढोरी शाखा कालव्यावरील शेतकऱ्यांनी पाणी उपसासाठी लावलेले सायपनचे पाईप पाटबंधारे प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी फोडले. यामुळे आर्थिक नुकसान झाल्याने शेतकरी वर्गात तीव्र नाराजी पसरली आहे. असे प्रसंग वारंवार घडत आहेत, त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देण्याची गरजेचे आहे.

काळमावाडी पाटबंधारे प्रकल्पाच्या निढोरी (ता.कागल) उपकालवा शाखेतून राधानगरी, कागल, भुदरगड तालुक्यातील शेत जमिनीला मोठ्या प्रमाणात पाणीपुरवठा केला जातो. हा प्रकल्प शेतकऱ्यांसाठी वरदायिनी ठरला आहे. शेतकऱ्यांच्या जीवनात हरितक्रांती बरोबर आर्थिक क्रांती झाली आहे. सध्या निढोरी कालवा शाखेतून पाणी सोडण्यात आले आहे. पण पाणी पुढे जात नाही. या कारणास्तव शेतकऱ्यांना कोणतीही समज न देता सायपनसाठी लावलेल्या पाईप फोडण्यात आल्या आहेत. ज्या ठिकाणी पाईप फोडता येत नाही, अशा ठिकाणी मात्र पाईपचे असणारे बंद बुच काढून नेलेली आहेत. मुदाळ, आदमापूर, निढोरी, कुरणी, चौंडाळ, सावर्डे, केनवडे आदी गावातील शेतकऱ्यांच्या पाईप फोडण्यात आल्या आहेत. त्यामुळे पाणीपुरवठा बंद झाल्याने शेतकऱ्यांतून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

एकीकडे पिकांना पाणीपुरवठा व्हावा चांगली पिके यावेत, यासाठी या कालव्यातून पाणी सोडले जात असताना केवळ कर्नाटकला किंवा संबंधित विभागाला पुढे पाणीपुरवठा होत नाही, या कारणास्तव कालवा काठावरील शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान करणे, हे पाटबंधारे खात्याच्या कुठल्या नियमात बसते, असा उद्विग्न संवाल शेतकरी करत आहेत. पाणी हे आमच्या हक्काचे आहे. कालव्याच्या पाटासाठी आम्ही जमिनी दिल्या आहेत. त्यामुळे आम्हाला मुबलक प्रमाणात पाणीपुरवठा करणे गरजेचे आहे. एकीकडे पाणीपुरवठा करणाऱ्या शेतजमिनीचा कर शेतकऱ्यांच्या खात्यातून जमा करून घेतला जातो. दुसरीकडे एखादा शेतकरी पाणीपट्टी भरायचा थकीत असेल. तर त्याला विभागीय कार्यालयाकडून पत्र पाठवून लेखी नोटीस देऊन सदरची रक्कम न भरल्यास आपल्या सातबारावर याचा बोजा नोंद करण्यात येईल, अशी धमकी दिली जाते. मग नेमके पाणी कोणासाठी हा प्रश्न निर्माण होतो. कालवा काठावरील फोडलेल्या पाईपला जबाबदार कोण असा प्रश्न केला जात आहे.

लोकप्रतिनिधींनी संबंधित बाबीकडे गांभीर्याने लक्ष देऊन अशी कृती करणाऱ्यांवर कारवाई करावी. ज्यांच्या पाईप फोडलेल्या आहेत, त्यांच्या पाईप जोडून देण्यात याव्यात. तसेच अधिकाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.

सायपनच्या पाईप फोडणे चुकीचे

कालव्यावर शेतकऱ्यांनी पाणी उपसा करण्यासाठी लावलेल्या सायपनच्या पाईप अधिकाऱ्यांनी फोडणे पूर्णपणे चुकीचे आहे. शेतकरी पाणीपट्टी भरत असताना त्यांचा असा आर्थिक तोटा करणे योग्य नाही. शेतकऱ्यांना आधी सुचना द्यावी. व त्यानंतर कारवाई करावी.
– आनंदा मांगोरे, कुरणी

हेही वाचा 

Back to top button