कोल्हापूर : अंबाबाई मूर्तीच्या पाहणीसाठी केंद्रीय पुरातत्त्व समिती येणार | पुढारी

कोल्हापूर : अंबाबाई मूर्तीच्या पाहणीसाठी केंद्रीय पुरातत्त्व समिती येणार

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : अंबाबाई देवीच्या मूर्तीची मंगळवारी सकाळी राज्य पुरातत्त्व विभागाच्या अधिकार्‍यांनी पाहणी केली. या विभागाचे सहसंचालक डॉ. विलास वाहने यांच्यासह पथकाने पाहणी केली. त्याचा प्राथमिक अहवाल तातडीने जिल्हाधिकार्‍यांना सादर केला. त्याआधारे जिल्हाधिकार्‍यांनी केंद्रीय पुरातत्त्व विभागाला पत्र दिले.

आता लवकरच केंद्रीय पुरातत्त्व विभागाच्या अधिकार्‍यांची समिती मूर्तीची पाहणी करणार आहे. यानंतरच पुढील निर्णय घेतला जाईल, असे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी सांगितले.

पुरातत्त्व विभागाने केलेल्या चुकीच्या संवर्धनामुळे अंबाबाईच्या मूर्तीचे स्वररूप बदलल्याचा आरोप अ‍ॅड. प्रसन्न मालेकर यांनी केला होता. त्या अनुषंगाने डॉ. विलास वाहने यांच्यासह कोल्हापूर विभागाचे उपअवेक्षक उत्तम कांबळे यांनी मूर्तीची पाहणी केली. देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे, मंदिर व्यवस्थापक महादेव दिंडे यावेळी उपस्थित होते. अर्धा तास पाहणी डॉ. वाहने यांच्या पथकाने मूर्तीची विविध बाजूंनी छायाचित्रे घेतली.

चेहर्‍यासह अलंकार, हाताची बोटे यांचीही माहिती घेतली. अर्धा तास हे अधिकारी गाभार्‍यामध्ये होते. मूर्तीची झीज झाली आहे किंवा कसे, त्यावर रासायनिक संवर्धन करावे लागेल का, याचा अहवाल त्यांनी जिल्हाधिकार्‍यांना दिला. हा अहवाल भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाला सादर करणार आहेत.

यापूर्वी जुलै 2015 मध्ये भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाच्या अधिकार्‍यांनी मूर्तीचे रासायनिक संवर्धन केले होते. या प्रक्रियेत बर्‍याच त्रुटी राहिल्याने हे संवर्धनाचे काम मूर्तीवर टिकले नसल्याचे अ‍ॅड. मालेकर यांचे म्हणणे आहे. तसेच देवीची मूर्ती बदलण्याबाबतही नोव्हेंबर 2022 मध्ये निवेदन देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

सप्टेंबर 2022 मध्ये क्लिनिंग

सप्टेंबर 2022 मध्ये दसर्‍यापूर्वी मूर्तीचे क्लिनिंग करण्यात आले होते. यावेळीही पुण्याहून आलेल्या पथकाने ही प्रक्रिया केली होती. त्याचा अहवालही भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाला सादर करण्यात आला होता. मंगळवारच्या पाहणीचा अहवाल वरिष्ठ कार्यालयाला पाठविणार असल्याचे डॉ. वाहने यांनी सांगितले.

केंद्रीय पुरातत्त्व तज्ज्ञांची समिती येणार

केंद्रीय पुरातत्त्व विभागाच्या तज्ज्ञांकडून 2015 साली मूर्तीवर रासायनिक संवर्धन प्रक्रिया झाली होती. हीच समिती पुन्हा मूर्तीची पाहणी करून मूर्तीची झीज कशामुळे झाली याची माहिती घेणार आहे. दर सहा महिन्यांनी ही समिती मूर्ती संवर्धनाबाबत पाहणी करणार आहे. पाहणीनंतर समिती जी सूचना करेल, त्यानुसार मूर्ती संवर्धनाबाबतची पुढील कार्यवाही केली जाईल, असेही जिल्हाधिकार्‍यांनी सांगितले.

Back to top button