कोल्हापूर : नियोजित उड्डाण पुलासाठी संयुक्त सर्वेक्षण | पुढारी

कोल्हापूर : नियोजित उड्डाण पुलासाठी संयुक्त सर्वेक्षण

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा :  शिरोली टोल नाका ते शिवाजी पूल या मार्गावरील नियोजित उड्डाण पुलासाठी महापालिका एनएचआय आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने बुधवारी संयुक्त सर्वेक्षण केले. उड्डाण पुलाचा प्रारूप आराखडा दोन दिवसांत तयार केला जाणार असल्याचे महापालिका शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी सांगितले. साडे सहा किमी अंतराच्या या उड्डाण पुलास सुमारे एक हजार कोटी खर्च अपेक्षित आहेत. निधीची उपलब्धता होताच दोन वर्षांत पुलाचे बांधकाम पूर्ण होऊ शकते.

कोल्हापुरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितिन गडकरी यांच्या सूचनेनुसार शहरात उड्डाण पूल बांधण्याचे नियोजन आहे. माजी आमदार अमल महाडिक यांनी गेल्या आठवड्यात महापालिका एनएचआय आणि सार्वजनिक बांधकाम यांची संयुक्त बैठक घेऊन बुधवारी (दि. 22) प्रत्यक्ष पाहणी करून सर्वेक्षण करण्याचा निर्णय झाला होता. या निर्णयानुसार बुधवारी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम राष्ट्रीय महामार्ग विभाग आणि महानगरपालिका, नगररचना विभागाच्या अधिकार्‍यांनी संंयुक्त पाहणी केली.

शिरोली नाका येथून सर्वेक्षणास सुरुवात झाली शिरोली नाका, ताराराणी चौक, दाभोळकर कॉर्नर, व्हिनस कॉर्नर, दसरा चौक, सीपीआर चौक, शिवाजी पूल या मार्गावर ठिकठिकाणी सर्वेक्षण केले. यावेळी शिरोली नाका ते सीपीआर चौक या मार्गात कोणताही अडसर येत नसल्याचे स्पष्ट झाले. यापूर्वीच या मार्गावर 30 मिटरचा रस्ता तयार असल्याने उड्डाण पुलास कोणताही अडथळा येणार नाही, असे महपाालिकेच्या अधिकार्‍यांनी स्पष्ट केले.

करवीर पंचायत समिती, पंचगंगा स्मशानभूमी-शिवाजी पूल पर्यायी मार्ग

सीपीआर चौक ते शिवाजी पूल हा मार्ग अरुंद असल्याने त्याला पर्याय शोधण्याचे काम सुरू आहे. पर्यायी मार्ग म्हणून करवीर पंचायत समिती कार्यालय, पंचगंगा स्मशानभूमी ते शिवाजी पूल असा उड्डाण पूल बांधण्याचे नियोजन आहे. या मार्गात कोठेही अडथळा येण्याची शक्यता कमी असल्याने या पर्यायावर विचारविनिमय सुरू आहे. या मार्गावर ताराराणी चौक, वटेश्वर महादेव मंदिर, दाभोळकर कॉर्नर, व्हिनस कॉर्नर, दसरा चौक सीपीआर चौक या ठिकाणी उड्डाण पुलावर जाण्या येण्यासाठी प्रवेश दिला जाणार आहे.
सर्वेक्षणानंतर महापालिकेत सायंकाळी बैठक झाली. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे सल्लागार डी. सी. चौगुले, शैलेंद्रसिंग दोन दिवसांत प्रारूप आराखडा तयार करणार आहेत. उड्डाण पाहणीवेळी महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक वसंत पंदरकर, सी. बी. भराडे, सा. बां. राष्ट्रीय महामार्ग विभागाचे तुषार शिरगुप्पे, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, नगररचना विभागाचे रमेश मस्कर यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

या मार्गावरील अडथळ्यांचाही होणार अभ्यास

शाहू नाका, शांतिनिकेतन, जरगनगर, संभाजी नगर, रिंगरोड ते फुलेवाडी या मार्गाचीही पाहणी करून सर्वेक्षण केले. या मार्गावरही उड्डाण पूल बांधण्याचे नियोजन आहे. बुधवारी या मार्गाचीही पाहणी करून सर्वेक्षण करण्यात आले. याबरोबरच शिये नाका ते सीपीआर चौक या मार्गाची पाहणी करून सर्वेक्षण करण्यात आले. या मार्गावरही उड्डाण पुलाचा विचार आहे. या दोन्ही मार्गाच्या पुलांबाबत सविस्तर अभ्यास करून निर्णय घेतला जाणार आहे. या मार्गावरील अडथळे कसे दूर करता येतील याचा अभ्यास केला जाणार आहे.

Back to top button