कोल्हापूर : सीपीआरचा बर्न वॉर्ड कधी होणार अद्ययावत? | पुढारी

कोल्हापूर : सीपीआरचा बर्न वॉर्ड कधी होणार अद्ययावत?

कोल्हापूर; डॅनियल काळे :  छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात (सीपीआर) गेल्या 20 वर्षांत अनेक सुविधा झाल्या असल्या, तरी या रुग्णालयातील बर्न वॉर्डमध्ये आजदेखील अतिशय सामान्य अशाच सुविधा उपलब्ध आहेत. भाजलेल्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी आवश्यक असणार्‍या सुविधांची येथे वाणवा आहे. विशेषतः भाजलेल्या रुग्णांवर उपचार करताना रुग्णाला जंतू संसर्ग होऊ नये, यासाठी काळजी घेणे आवश्यक असते. सीपीआरच्या बर्न वॉर्डमध्ये नेमकी याचबाबतीत हेळसांड होते. खासगी रुग्णालयातील उपचार महागडे असतात, ते सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरचे असतात. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णांना सीपीआर शिवाय पर्यायच नाही. त्यामुळे चांगल्या दर्जाचा आणि जंतू संसर्गाचा धोका नसलेल्या एका सुसज्ज बर्न वॉर्डची सीपीआरला गरज आहे.

कोल्हापूरचे सीपीआर हॉस्पिटल थोरला दवाखाना या नावाने जिल्हाभर परिचित आहे. कोल्हापूरसोबतच आजुबाजूच्या जिल्ह्यातील रुग्णही येथे उपचार घेण्यासाठी येतात. 2000 मध्ये तत्कालीन आरोग्यमंत्री दिग्विजय खानविलकर यांनी या रुग्णालायात अनेक सुविधा निर्माण केल्या. नेत्र विभाग, हदयशस्त्रक्रिया विभाग, राजर्षी छत्रपती शाहू महाराज वैद्यकीय महाविद्यालय अशा अनेक सुविधा त्यांनी या काळात निर्माण केल्या. सध्या हे रुग्णालय 600 खाटांचे आहे. सर्वच आजारावर येथे उपचार केले जातात. हे जिल्हा रुग्णालय असल्याने येथे येणार्‍या सर्वच प्रकारच्या रुग्णांचा मोठा ताण आहे. बर्न वॉर्डसुद्धा चांगल्या दर्जाचा निर्माण करण्याची योजना तत्कालीन आरोग्यमंत्री दिग्विजय खानविलकर यांनी आखली होती. परंतु, त्यांच्यानंतर या योजनेचा पाठपुरावा कोणी केला नाही. त्यामुळे हा विभाग अद्यापही सामान्य अवस्थेतच आहे.

नव्या इमारतीत आधुनिक सुविधेची गरज

सीपीआरच्या आवारात सर्वात शेवटी डिलिव्हरी वॉर्डच्या मागे बर्न वॉर्ड आहे. अनेक अपघात घडतात. कौटुंबिक कलहातून काहीजण अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतात. अशा घटनांमुळे जिल्ह्यात भाजलेले रुग्ण नियमितपणे या रुग्णालयात उपचारासाठी येत असतात. त्यामुळे हा विभाग अद्ययावत करणे गरजेचे आहे. चांगली इमारत, चांगल्या खॉट, रुग्ण डिस्चार्ज घेतल्यानंतर त्या बेडवरचे बेडशिट बदलणे अशा छोट्या-घोट्या गोष्टीपासून ते चांगले उपचार करण्यापर्यंतची काळजी प्रशासनाने घ्यायला हवी. वातानुकूलित यंत्रणा या विभागात बसल्याने रुग्णांना वेदनेच्या झळा काही प्रमाणात सुसह्य होत आहेत. तसेच अलीकडच्या काळात प्लास्टिक सर्जरीचीही सुविधा निर्माण झाली आहे. या काही जमेच्या बाजू सोडल्या, तर इतर सुविधांची मात्र वाणवाच आहे.

Back to top button