कोल्हापूर : ‘मोका’फेम गुंडांच्या गर्दीने कळंबा जेल हाऊसफुल्ल! | पुढारी

कोल्हापूर : ‘मोका’फेम गुंडांच्या गर्दीने कळंबा जेल हाऊसफुल्ल!

कोल्हापूर, दिलीप भिसे : गुन्हे शाबितीकरणामुळे राज्यातील कारागृहांत कैद्यांची गर्दी वाढत असतानाच कळंबा कारागृह प्रशासन मात्र भलत्याच कारणांनी बेजार झाले आहे. संघटित टोळ्यांच्या माध्यमातून दहशत माजविणार्‍या आणि महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण (मोका) कायद्यांंतर्गत कारवाई झालेल्या नामचीन टोळ्यांमधील साडेतीनशेवर कैद्यांचा एकाच ठिकाणी भरणा झाल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे.

अपुर्‍या मनुष्यबळासह रक्षकांवरील वाढते जीवघेणे हल्ले अन् कैद्यांमध्ये धुमसणार्‍या संघर्षामुळे वरिष्ठ अधिकारी, सुरक्षा रक्षकांनाही जीव मुठीत धरूनच रात्रंदिवस खडा पहारा द्यावा लागत आहे. त्यातूनही अधिकारी, रक्षकांना एकाकी गाठून त्यांच्यावरही जीवघेण्या हल्ल्यांच्या थरारक घटनांना सामोरे जावे लागत आहे. दीड महिन्यात कळंबा कारागृहात अधिकार्‍यांसह दोन रक्षकांना अशा घटनांना तोंड द्यावे लागले आहे. केवळ सुदैवाने त्यांची सुटका झाली खरी…

अलीकडच्या काळात कन्व्हेक्शन रेटचे प्रमाण वाढत आहे. गंभीर गुन्ह्यांतील आरोपींच्या शिक्षेत कमालीने वाढ होत आहे. परिणामी, राज्यातील बहुतांशी मध्यवर्ती कारागृहांत कैद्यांची संख्या वाढू लागली आहे. भविष्यात गुन्हे शाबितीकरणाचे प्रमाण कालांतराने वाढत राहिल्यास राज्यातील कारागृहांमधील यंत्रणा अपुरी पडू लागेल.

‘मोका’फेम संघटित टोळ्यांची एकाच ठिकाणी गर्दी

कळंबा मध्यवर्ती कारागृहात 1 हजार 665 पुरुष आणि 34 महिला अशी एकूण 1 हजार 699 बंदी क्षमता असताना सद्यस्थितीत 2 हजार 56 पुरुष व 60 महिला कैद्यांची गर्दी झाल्याचे दिसून येते. त्यात सर्वाधिक म्हणजे, ‘मोका’ कायद्यांतर्गत कारवाई झालेल्या साडेतीनशेवर सराईत गुन्हेगारांची एकाच ठिकाणी गर्दी झाल्याने कारागृह यंत्रणेची पाचावर धारण बसली आहे. मुंबई, पुण्यासह मराठवाडा, विदर्भासह राज्यातील अन्य ठिकाणच्या सराईतांना कळंबा कारागृहात हलविण्यात आले आहे.

सांगली, सातारा, पुण्यासह मुंबईतील गुंडांची तोबा गर्दी

कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांसह कोल्हापूर परिक्षेत्रात 2021 व 2022 या काळात संघटित टोळ्यांच्या माध्यमातून दहशत माजविणार्‍या एकूण 63 टोळ्यांतील 460 गुंडांवर ‘मोका’अंतर्गत कारवाई करण्यात आली असून, 288 जणांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. 60 गुंड अजूनही पसार आहेत. कोल्हापूर, सांगलीसह सातारा, सोलापूर, पुणे, ग्रामीणसह पुणे शहर व मुंबईतील नामचीन गुंडांची कळंबा कारागृहात तुडुंब गर्दी झाली आहे. याशिवाय अन्य राज्यांतील अतिधोकादायक अशी दफ्तरी नोंद असलेल्या टोळ्यांच्या म्होरक्यांनाही कळंबा कारागृहात बंदिस्त करण्यात आल्याने अपुरे मनुष्यबळ असलेल्या कळंबा कारागृहावर अतिरिक्त ताण वाढला आहे.

Back to top button