कोल्हापूर : सादळे-मादळे घाटात दुचाकी अपघातात दोन ठार | पुढारी

कोल्हापूर : सादळे-मादळे घाटात दुचाकी अपघातात दोन ठार

कासारवाडी; पुढारी वृत्तसेवा : सादळे-मादळे (ता. करवीर) येथील कासारवाडी जवळील घाटात आज (दि.१३) झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला. कुरण माळाजवळ झालेल्या या अपघातात दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाली. यावेळी एक जण जागीच ठार झाला, तर दुसऱ्या दुचाकीस्वाराला रुग्णालयात घेऊन जाताना त्याचा वाटेतच मृत्यू झाला. अनिल बाबुराव वरुटे (वय ३६, रा. कासारवाडी ), नारायण तुकाराम मडके (वय ३६, रा. मादळे) अशी मृतांची नावे आहेत.

याबद्दल अधिक माहिती अशी, अनिल वरुटे आपल्या कुटुंबासह सादळे येथील साळुंखे फार्म हाऊसमध्ये मजूर म्हणून काम करतो. सोमवारी सायंकाळी सव्वासात वाजण्याच्या सुमारास आपल्या मोटरसायकल (एम.एच. ०९-बी.डी.९१६१) वरून कासारवाडीकडे येत होता. यावेळी नारायण मडके हा व्यक्ती आपल्या आपल्या दुचाकीवरून (एम. एच. ०९- डी. डब्ल्यू. ०३०७) मादळेकडे जात होता. यावेळी कासारवाडी व सादळे येथील कुरण माळाजवळ दोघांच्या दुचाकीची समोरासमोर धडक झाली. यात अनिल वरुटे यांच्या डोक्याला जोराचा मार लागल्याने तो जागीच ठार झाला. तर नारायण मडके याला उपचारासाठी स्थानिक नागरिकांनी कोल्हापूर येथील रुग्णालयात दाखल केले असता त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

हे वाचलंत का? 

Back to top button