कोल्हापूर : ईर्ष्या, हुल्लडबाजी फुटबॉलला मारक | पुढारी

कोल्हापूर : ईर्ष्या, हुल्लडबाजी फुटबॉलला मारक

कोल्हापूर, सागर यादव : शतकी परंपरा लाभलेला कोल्हापुरातील फुटबॉल खेळ आणि फुटबॉल प्रेम संपूर्ण देशात प्रसिद्ध आहे; पण सध्या तालीम, मंडळ, पेठा यांच्यातील नाहक ईर्ष्या, हुल्लडबाजी व समर्थकांच्या अतिउत्साहामुळे कोल्हापूरचा फुटबॉल बदनाम होत आहे. इतकेच नव्हे, तर यामुळे चांगल्या खेळाडूंचेही नुकसान होत आहे.

प्रत्येक घटकासाठी सूचना

प्रत्येकाला आपल्या संघाचा अभिमान असतोच. यात काही चुकीचे नाही; पण खेळात स्पर्धा हवी ईर्ष्या नको. स्पर्धा म्हणजे हार-जीत ही असणारच; पण जिंकल्याचा आनंद साजरा करावा. अतिउत्साह, अतिरेकीपणा नको. हार झाल्यास ती मान्य करून विजेत्यांचे अभिनंदन करून खिलाडूवृत्ती जोपासणाराच खरा खेळाडू. कोल्हापुरातील फुटबॉलचा, खेळाडूंचा विकास करायचा असेल, तर सामन्यावेळी एकमेकांना होणारी शिवीगाळ, वाद, भांडणे थांबली पाहिजेत. अतिउत्साही तरुणांनी गुन्हे दाखल होतील, असे कृत्य करू नये. ‘केएसए’ने गैरवर्तन करणार्‍या खेळाडूंसाठी कठोर नियमावली करून त्याची अंमलबजावणी करावी. पंचांनीही नि:पक्षपणे निर्णय घ्यावेत. पंचांकडून चुकीचे निर्णय झाल्यास मैदानातील वातावरण बिघडणार नाही याचा संयम संघ, खेळाडूंनी ठेवणे अत्यावश्यक आहे.

गुटखा-मावा आणि दारूने खतपाणी

2013 पर्यंतच्या काळात कोल्हापूरचा फुटबॉल मैदानात गर्दी खेचत होता; मात्र नंतर हुल्लडबाजी, भांडण, हाणामारी, दगडफेक अशा प्रकारांमुळे निर्माण होणार्‍या कायदा-सुव्यवस्थेमुळे स्पर्धांवर बंदीही घालण्यात आली होती. नंतर पुन्हा स्पर्धा सुरू करण्यात आल्या. काही दिवस शांततेत गेल्यानंतर पुन्हा मागे तसे पुढे सुरू झाले आहे.

फुटबॉल मैदानातील हुल्लडबाजीला गुटखा-मावा-दारूने खतपाणी मिळत आहे. प्रेक्षक गॅलरीत अनेक हुल्लडबाज गुटखा-मावा-दारूचे बिनधास्त सेवन करतात. गलिच्छपणे मावा-गुटख्याच्या पिचकार्‍या मैदानात कोठेही मारतात. खेळाडू व पंचांना अश्लील शिवीगाळ करणे, अश्लील हावभाव करणे अशा गोष्टींमुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक व महिला अनेकदा इच्छा असूनही फुटबॉल सामन्यांना येत नसल्याचे वास्तव आहे.

हुल्लडबाजीची कीड

कोल्हापूरच्या फुटबॉल क्षेत्राला हुल्लडबाजीची कीड लागली आहे. याचा प्रभाव केवळ फुटबॉल स्पर्धांपुरता मर्यादित न राहता अगदी शालेय क्रीडा स्पर्धेपासून ते सर्वच खेळांच्या स्पर्धांपर्यंत पोहोचला आहे. इतकेच नव्हे तर वर्षभर सुरू राहणार्‍या सण-उत्सव-समारंभ, राजकीय, सामाजिक क्षेत्रापर्यंत याचे परिणाम पाहायला मिळत आहेत. सोशल मीडियामुळे हुल्लडबाजीला खतपाणी मिळत असून ती प्रचंड प्रमाणात फोफावली आहे. यामुळे हुल्लडबाजीमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे.

Back to top button