डणगे : पुढारी वृत्तसेवा : वडणगे (ता.करवीर )येथील शिव-पार्वती तलाव सांडपाण्यामुळे पूर्ण दूषित झाल्यामुळे गेली काही महिने तलाव जलपर्णीने व्यापला होता. वडणगे ग्रामपंचायतीच्या नूतन सभागृहाने पदभार स्वीकारल्यानंतर तलावातील जलपर्णी काढण्याचे काम सुरू केले. गेल्या महिनाभरापासून तलावातील जलपर्णी काढण्याचे काम सुरू होते. जलपर्णी काढल्यामुळे तलावाने मोकळा श्वास घेतला आहे.
वडणगे गावची महाशिवरात्री यात्रा १८ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. यात्रेच्या पार्श्वभूमीवर तलाव जलपर्णी मुक्त झाल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे. सुमारे ३५ एकरहून अधिक जागेत व्यापलेला शिव-पार्वती तलाव सांडपाण्यामुळे दूषित झाला आहे. तलाव संवर्धनासाठी दोन वर्षांपूर्वी राज्य सरोवर संवर्धन योजनेतून पावणेचार कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला होता. या योजनेतून तलावातील गाळ काढण्यात आला. मात्र, राजकारण व श्रेयवादामुळे या योजनेचे काम रखडले.
या योजनेत तलावात मिसळणाऱ्या सांडपाण्याकडे दुर्लक्ष झाल्याने तलाव पुन्हा दूषित पाण्याने भरला व जलपर्णीने व्यापला होता. जलपर्णीमुळे तलावाला एखाद्या मैदानाचे स्वरूप प्राप्त झाले होते. वडणगे ग्रामपंचायतीने जेसीबीच्या सहाय्याने तलावातील जलपर्णी काढली. त्यामुळे तलावाचे काही प्रमाणात अस्तित्व दिसत आहे. जलपर्णी काढण्याच्या या कामात येथील गोसावी समाजातील मासेमारी करणाऱ्या काही लोकांनी विना मोबदला मदत केली.
वडणगेचा शिव-पार्वती तलाव हा गावचे नैसर्गिक वैभव आहे. मात्र, गावाच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या या तलावाचे महत्त्व अजुनही कोणाला कळलेले नाही. वडणगे गावचा श्वास असणारा हा तलाव सांडपाण्यामुळे मृतावस्थेकडे वाटचाल करीत आहे. तलावात मिसळणारे सांडपाणी हे तलावाचे मूळ दुखणे आहे. त्याचे योग्य निर्गतीकरण होणे गरजेचे आहे. तलावातील जलपर्णी काढणे ही केवळ तात्पुरती मलमपट्टी आहे. तलावाच्या मूळ दुखण्यावर उपाय होणे व तलावाचे नैसर्गिक सौंदर्य टिकवणे गरजेचे आहे.
हेही वाचा