कोल्हापूर : महाआरतीसाठी पंचगंगा घाट सजू लागला | पुढारी

कोल्हापूर : महाआरतीसाठी पंचगंगा घाट सजू लागला

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा :  पंचगंगा घाटावर रविवारी (दि. 19) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते महाआरती होणार आहे. याकरिता पंचगंगा घाटाची स्वच्छता आणि दुरुस्तीचे काम महापालिकेने सुरू केले असून आता त्याला वेग आला आहे. परिसरात केल्या जात असलेल्या कामामुळे पंचगंगा घाट आता सजू लागला आहे.

कणेरी येथील सिद्धगिरी मठ महासंस्थानच्यावतीने दि. 20 ते दि. 26 फेब—ुवारी या कालावधीत ‘सुमंगलम् पंचमहाभूत लोकोत्सव’ आयोजित केला आहे. या महोत्सवाच्या पूर्वसंध्येला रविवारी दि.19 रोजी शिवजयंतीनिमित्त कोल्हापुरात भव्य शोभायात्रेचे आयोजन केले आहे. या शोभायात्रेचा समारोप पंचगंगा नदी घाटावर होणार असून, यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत पंचगंगेची महाआरती होणार आहे. या महाआरतीसाठी पंचगंगा घाट परिसराची स्वच्छता मोहीम सुरू करण्यात आली. घाटावरील खरमाती, कचरा हटवण्यात आला आहे. काठावरील पाण्यातील कचराही काढण्यात येत आहे. घाटावरील दगडी पायर्‍यांचीही स्वच्छता केली जात असून परिसरात रंगरंगोटी केली जाणार आहे. घाटावरील दगडी कामांच्या निखळलेल्या दर्जा भरून घेण्यात येत आहेत. तसेच या ठिकाणी काही खराब झालेले कठडे नव्याने उभारले जात आहेत.

घाटावरील लोखंडी ग्रील नव्याने बसवण्यात येत असून त्यालाही रंगरंगोटी केली जात आहे. धोबी घाटाकडे जाणार्‍या मार्गाचेही सपाटीकरण करण्यात आले आहे. गायकवाड पुतळा ते तोरस्कर चौक रस्त्यावरील खरमातीचे ढीग हटवण्यात येत आहेत. गायकवाड पुतळा ते पिकनिक पॉईंट या मार्गावरही सपाटीकरण करण्यात येत आहे. घाटावर हॅलोजन टॉवर उभारण्यात येणार असून संपूर्ण परिसरात रोषणाईही केली जाणार आहे.

Back to top button