कोल्हापूर : महागाईमुळे ऊसशेती परवडेना..! | पुढारी

कोल्हापूर : महागाईमुळे ऊसशेती परवडेना..!

कुडित्रे, प्रा. एम. टी.शेलार : यावर्षी पावसामुळे घटलेले दर एकरी उत्पादन, तोडणी, वाहतूकदारांची प्रतिटन 250 ते 300 रुपये अतिरिक्त खंडणी,निविष्ठांचे वाढलेले दर यामुळे मुळात गाळात असणारा ऊस उत्पादक आणखी गाळात रुतत चालला आहे. त्यामुळे उसाचे पीकच परवडत नाही.

उसाचा एकरी उत्पादन खर्च…

कोपार्डे (ता. करवीर) येथील शेतकरी रंगराव पाटील यांनी व्हाऊचर्ससह लिहून ठेवलेला उसाचा एकरी उत्पादन खर्च असा : पहिली नांगरट एकरी 5 हजार रुपये, दुहेरी नांगरट म्हणजे द्वारणी 3 हजार 200 रुपये, सरी काढणे 2 हजार 800 रुपये, लावण करणे, ऊस बेणे, रोप लावण (6 हजार रोपे, प्रतिरोप 1 रुपये 80 पैसे, 12 हजार रुपये, लावण करणे मजुरांची (खंडित) मजुरी 2 हजार रुपये, आळवणी औषध 900 रुपये, खताचा पहिला डोस (1 हजार 800 रुपये प्रतिबॅग द्ब 6 बॅग्ज) 10 हजार 800 रुपये, भरणीचा डोस (1 हजार 800 रु. द्ब 6 बॅग्ज), 10 हजार 800 रुपये, खत घालणे मजुरी 1 हजार रुपये, भरणीचे औत 5 हजार रुपये, वाकुरी मारणे 2 हजार रुपये, पाणीपट्टी एकरी 10 हजार रुपये, भांगलण, तणनाशक औषध 18 हजार रुपये, 20 वेळा पाणी पाजणे मजुरी (200 रु. हजेरी ) 4 हजार रुपये.

एकूण उत्पादन खर्च 87 हजार 500 रुपये. त्याची व त्याच्या कुटुंबीयांची मजुरी 25 हजार 550 रुपये (365 दिवस द्ब 70 रुपये हजेरी ) हा झाला सी-1 + एफ.एल.खर्च. एकूण 1 लाख 13 हजार 50 रुपये. अधिक या गुंतवणुकीवर व्याज (10 टक्के)11 हजार 355 रुपये, एकूण खर्च 1 लाख 24 हजार 905 रुपये.

सी-2 + एफ.एल. या पद्धतीने या खर्चावर त्याला 50 टक्के नफा देण्यास स्वामिनाथन समितीने सुचविले आहे. म्हणजे एकूण उत्पादन खर्च 1 लाख 24 हजार 995 रुपये अधिक त्यावर 50 टक्के नफा म्हणजे 1 लाख 87 हजार 357 रुपये त्याला मिळाले पाहिजेत. एकरी 30 टन उत्पादन गृहीत धरले तर प्रतिटन 6 हजार 245 रुपये दर देणे उचित आहे हे अर्थशास्त्रीय सत्य आहे.

शेतकरी उसापासून फारकत घेण्याची शक्यता

शेतकर्‍याची कुटुंबीयांसह शेतातील राबणूक विचारात न घेता एकरी 87 हजार 500 पाचशे रुपये खर्च येतो. महाराष्ट्राचे सरासरी एकरी उत्पादन 34 टन आहे. त्यात यावर्षी आणखी सात टनांची घट होणार आहे. त्यात वाढलेल्या तोडणी खर्चाची आणि मनःस्तापाची भर पडणार आहे. शेतीचा उत्पादन खर्च प्रतिटन 3 हजार 250 येतो. याचा सरळ अर्थ ऊसशेती आतबट्ट्यात. म्हणून शेतकरी उसापासून फारकत घेण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Back to top button