कोल्हापूर : सीपीआरच्या हृदयशस्त्रक्रिया विभागाची गुणवत्ता सिद्ध! | पुढारी

कोल्हापूर : सीपीआरच्या हृदयशस्त्रक्रिया विभागाची गुणवत्ता सिद्ध!

कोल्हापूर; राजेंद्र जोशी :  रोगाचे अचूक निदान न झाल्यामुळे स्वतःच्या कर्त्या-सवरत्या मुलाला मृत्यूने आपल्या दाढेत घेतल्याचे दुःख पचविल्यानंतर बरोबर वर्षाने दुसरा मुलगा त्याच आजाराने मृत्यूच्या दाढेत अडकला, तर त्या मातेचे काळीज किती हेलावले असेल? कोल्हापूरच्या छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयातील हृदयशस्त्रक्रिया विभागाने या आजाराचे योग्य निदान केले. तातडीच्या उपचाराने या विभागाचे प्रमुख हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अक्षय बाफना यांच्या पथकाने या रुग्णाला मृत्यूच्या दाढेतून मुलाला बाहेर काढले. शिवाय, इतर रुग्णालयांनी उपचारासाठी असमर्थता दाखविल्यानंतर संबंधित रुग्ण उपचार घेऊन सहिसलामत घरी परतला आहे.

वाळवा तालुक्यातील चिकुर्डे गावामधील एका सामान्य कुटुंबातील (कुटुंबाच्या विनंतीमुळे नाव गुप्त ठेवले आहे) ही दर्दभरी कहाणी आहे. या कुटुंबात आरोग्य विज्ञानाच्या क्षेत्रामध्ये हंटर सिंड्रोम म्हणून ओळखल्या जाणार्‍या जनुकीय आजाराचा संसर्ग झाला होता. अत्यंत दुर्मीळ, अनुवंशिक विकार म्हणून ओळखल्या जाणार्‍या या आजारामध्ये मानवी शरीरात साखरेच्या रेणूंचे योग्य विघटन होत नाही. जेव्हा हे रेणू कालांतराने अवयव आणि उतींमध्ये तयार होतात, तेव्हा ते शारीरिक आणि मानसिक विचार क्षमतांवर परिणाम करून मोठे नुकसान करतात. लहान मुलांमध्ये हा विकार आढळतो. याला म्यूकोपॉलिसॅकरिडोसेस (एमपीएस) या नावानेही ओळखले जाते. हा आजार एक्स या गुणसूत्राशी संबंधित आहे. मातेकडून तो मुलांमध्ये तो संक्रमित होतो. मुलींच्या गुणसूत्रांमध्ये दोन एक्स असल्यामुळे त्यांना हा आजार होण्याची जोखीम कमी असली, तरी मुलांमध्ये मात्र हा आजार जाणवतो. दीड लाख नागरिकांमध्ये एक असे त्याचे प्रमाण आहे. एक्स या गुणसूत्राशी निगडित विशिष्ट उत्प्रेरके (एन्झाईम्स) निर्माण होण्याची प्रक्रिया कमी झाल्याने रक्तशर्करेचे विघटन होत नाही. परिणामी, हा आजार जडतो. या कुटुंबातील थोरल्या मुलामध्ये गतवर्षी या आजाराची भयावहता दिसून आली; पण त्याच्या रोगाचे योग्यवेळी अचूक निदान न झाल्यामुळे हृदयविकाराच्या झटक्याने 6 जानेवारी 2022 रोजी त्याचे निधन झाले होते.

दैवदुर्विलास कसा असतो पहा. या कुटुंबातील दुसर्र्‍य मुलाला काही दिवसांपूर्वी धाप लागली. धाप इतकी मोठी की, 32 वर्षीय या रुग्णाला धड झोपताही येत नव्हते आणि झोपले तर ठसका आणि खोकल्याने रुग्ण बेजार होत होता. या धापग्रस्त रुग्णाला रक्तविकार असेल, अशा कल्पनेने प्रसिद्ध रक्तरोगतज्ज्ञ डॉ. वरुण बाफना यांच्याकडे उपचारासाठी आणले. त्यांनी रक्ताचे नमुने आणि सोनोग्राफी करताच रुग्णाचे प्लेटलेटस् काऊंट 28 हजारांपर्यंत खाली आल्याचे तसेच पांढर्‍या पेशीही कमी झाल्याचे निदर्शनास आले.

डॉ. वरुण बाफना यांनी हा रुग्ण डॉ. अक्षय बाफना यांच्याकडे वर्ग केला. त्यांनी रुग्णाचा टू डी इको-कार्डिओग्राम केला असता संबंधित रुग्णाच्या हृदयाच्या डाव्या कप्प्याच्या शुद्ध रक्तामधील झडपेची रुंदी कमी झाल्याचे निदर्शनास आले. झडप क्षेत्राची ही रुंदी साधारण 6 सेंटीमीटर इतकी असते. पण या रुग्णाच्या झडपेची रुंदी अवघ्या अर्ध्या चौरस सेंटीमीटरवर आल्याने रक्तदाब वाढून त्याची धाप वाढली होती. अशा रुग्णांवर झडप रुंद करण्याची शस्त्रक्रिया तातडीने करणे आवश्यक होते. तसेच रुग्णाच्या रक्तातील प्लेटलेटस् खूपच कमी असल्याने रुग्ण ऑपरेशन टेबलवरच दगावण्याची जोखीम मोठी होती. पण सीपीआरमधील हृदयशस्त्रक्रिया विभागात डॉ. अक्षय बाफना यांच्या नेतृत्त्वाखालील पथकाने बिनटाक्याची बलून मायट्रल वोल्वोटॉमी ही अत्यंत गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी करून रुग्णाच्या हृदयाच्या झडपेची रुंदी दीड चौरस सेंटीमीटरपर्यंत नेण्यात यश मिळविले. यामध्ये रोगाचे निदानही झाले आणि रुग्णावर योग्य उपचार झाल्याने त्याचा जीवही वाचला. या शस्त्रक्रियेसाठी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रदीप दीक्षित, डॉ. वरुण बाफना व वैद्यकीय पथकातील अन्य अधिकारी, कर्मचार्‍यांचे मोठे योगदान लाभले.

रोगावरील उपचारासाठी अत्याधुनिक यंत्रणेबरोबर अचूक रोगनिदान सर्वाधिक महत्त्वाचे असते. असे निदान योग्य वेळी झाले, तर उपचाराची दिशा आणि प्रयत्नांची पराकाष्ठा करता येते. रुग्णालयातील या रुग्णाला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढण्यासाठी अचूक रोगनिदानाची जोड मिळाली आणि सीपीआरमधील अत्याधुनिक उपचार यंत्रणेमुळे रुग्णाला दिलासा देणे शक्य झाले.
– डॉ. अक्षय बाफना,
हृदयरोग विभागप्रमुख, सीपीआर रुग्णालय

Back to top button