कोल्हापूर : गरुड मंडप, नगारखान्याचे काम ‘पुरातत्त्व’च्या देखरेखीखाली : जिल्हाधिकार्‍यांची माहिती | पुढारी

कोल्हापूर : गरुड मंडप, नगारखान्याचे काम ‘पुरातत्त्व’च्या देखरेखीखाली : जिल्हाधिकार्‍यांची माहिती

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा :  करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरातील गरुड मंडप आणि नगारखान्याचे काम राज्य पुरातत्त्व विभागाच्या देखरेखीखाली केले जाईल, असे जिल्हाधिकारी तथा देवस्थान समितीचे प्रशासक राहुल रेखावार यांनी सांगितले. गरुड मंडप, नगारखान्यात करण्यात येणार्‍या दुरुस्तीची त्यांनी दोन तास पाहणी केली. दरम्यान, नवीन रथाची रविवारी पूजा करण्यात येणार असून यंदाच्या रथोत्सवात पूर्ण सागवानी लाकडात केलेला हा नवा रथ वापरला जाणार आहे.

गरुड मंडपातील लाकडी खांब खराब झाले आहेत. तसेच नगारखान्यातील लाकूड कामही खराब झाले आहे. खराब झालेले खांब बदलण्यात येणार आहेत. त्याकरिता कोल्हापूर हेरिटेज समितीने परवानगी दिली आहे. दोन दिवसांत राज्य पुरातत्त्व समितीचीही परवानगी मिळेल, असे देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांनी सांगितले.
गरुड मंडप, नगारखान्यातील कामासाठी ‘पुरातत्त्व’च्या अधिकार्‍यांची नेमणूक केली जाणार आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम केले जाणार आहे. फेब—ुवारी आणि मार्च महिन्यात मंदिरात तुलनेने गर्दी कमी असते. त्यामुळे या दोन महिन्यांत अधिकाधिक काम करत मे अखेर हे सर्व काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे.

जमिनीखालील खांब कुजले

गरुड मंडपातील खांब जमिनीखाली कुजलेले आहेत. अभिषेकाचे पाणी मुरल्याने हे खांब कुजले आहेत. यामुळी मंडप खालच्या बाजूने कललेला आहे.

रविवारी नवीन रथाची पूजा

करवीर निवासिनी श्री अंबाबाईचा रथ नव्याने करण्यात येत आहे. पूर्ण सागवानाच्या लाकडात तयार केलेला हा रथ रविवारी (दि. 22) चाकावर बसविण्याचे काम विधिवत पूजा करून सुरू केले जाणार आहे. यापूर्वीचा रथ दोन वेळा खराब झाला होता. प्लास्टिक, फायबर, प्लायवूड, लोखंडी पट्ट्या आदींचा वापर करून रथाची तात्पुरती दुरुस्ती केली होती. आता रथ संपूर्ण सागवानी लाकडात तयार केला असून पुढील दीड-दोनशे वर्षे तो सुरक्षित राहील, असा दावा देवस्थान समितीने केला आहे. येत्या जोतिबा चैत्र यात्रेनंतर 6 एप्रिल रोजी होणार्‍या रथोत्सवासाठी हा नवा रथ वापरला जाणार आहे.

Back to top button