कोल्हापूर : विधवा प्रथा बंद केल्याबद्दल हेरवाड गावाला राज्य महिला आयोगाचा पुरस्कार जाहीर | पुढारी

कोल्हापूर : विधवा प्रथा बंद केल्याबद्दल हेरवाड गावाला राज्य महिला आयोगाचा पुरस्कार जाहीर

कुरुंदवाड; पुढारी वृत्तसेवा : हेरवाड (ता.शिरोळ) गावाने विधवा प्रथा बंदीचा ऐतिहासिक निर्णयाची दखल आता महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने घेतली आहे. या ऐतिहासिक निर्णयाच्या सन्मानार्थ हेरवाड गावाला महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. दरम्यान 25 जानेवारीला पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या दीपा ठाकूर यांनी पत्राद्वारे कळवले आहे. मुंबई येथे महिला आयोगाच्या वर्धापनदिनी हा पुरस्कार माजी सरपंच सुरगोंडा पाटील व सर्व माजी सदस्य तसेच ग्रामविकास अधिकारी पी.आर. कोळेकर यांचा सत्कार करून प्रदान करण्यात येणार आहे.

राज्य महिला आयोगाच्या वर्धापन दिनादिवशी राजकारण, समाजकारण आणि प्रशासन अशा क्षेत्रात महिलांसाठी भरीव आणि उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येतो. हेरवाड ग्रामपंचायतीने मे 2022 रोजी पतीच्या निधनानंतर महिलेच्या बांगड्या फोडणे, कुंकू पुसणे, गळ्यातील मंगळसूत्र तोडणे अशा अनिष्ट परंपरा बंद करून विधवा महिलांना सौभाग्यवती प्रमाणेच सर्वत्र सन्मान देण्याच्या दृष्टीने विधवा प्रथा बंदीचा ठराव करत संपूर्ण राज्यात आदर्श निर्माण केला होता.

महाआघाडी सरकारने हेरवाड पॅटर्न नावाने याबाबतचा शासन निर्णय काढत सर्व ग्रामपंचायतीना कळविले. राज्यातील प्रत्येक गावामध्ये याची अंमलबजावणी करण्याच्या सूचनाही देत हा कायदा करण्याचा निर्णय घेतला. हेरवाड गावाला पुरस्कार जाहीर झाल्याने फटाक्याची आतषबाजी करून आनंद उत्सव साजरा करण्यात आला आहे.

हेही वाचा;

Back to top button