‘गोकुळ’चे सरकारकडून चाचणी लेखापरीक्षण | पुढारी

‘गोकुळ’चे सरकारकडून चाचणी लेखापरीक्षण

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : गेले काही दिवस थंड असलेल्या ‘गोकुळ’च्या राजकारणाला उकळी फुटली आहे. विरोधी गटाच्या संचालक शौमिका महाडिक यांच्या तक्रारीनुसार सरकारने ‘गोकुळ’चे चाचणी लेखापरीक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी अहमदनगरचे विशेष लेखापरीक्षक बी. एस. मसुगडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, असा आदेश अद्याप ‘गोकुळ’ला मिळाला नसल्याचे कार्यकारी संचालक योगेश गोडबोले यांनी सांगितले.

या आदेशानुसार ‘गोकुळ’चे 2021-22 चे शासकीय चाचणी लेखापरीक्षण करण्याचे आदेश विशेष कार्यकारी अधिकारी रा. स. शिर्के यांनी दिले आहेत.

‘गोकुळ’मध्ये सत्तांतर झाल्यानंतर शौमिका महाडिक यांनी सत्ताधार्‍यांच्या कारभारावर आक्षेप घेत त्यांना रोखण्याचा प्रयत्न सुरू केला. मुंबईतील पॅकिंगचा ठेका, ‘गोकुळ’च्या सर्वसाधारण सभेचे बदलण्यात आलेले ठिकाण, वासाचे दूध, पशुखाद्याची ढासाळलेली गुणवत्ता आणि जिल्ह्यातील दूध संकलनात झालेली घट, यावर सत्ताधार्‍यांना त्यांनी धारेवर धरण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर त्यांनी ‘गोकुळ’च्या लेखापरीक्षणाबाबत प्रश्न उपस्थित करत लेखापरीक्षक मंडळाकडे तक्रार केली होती. त्यानुसार आता हे चाचणी लेखापरीक्षण होणार आहे.

चाचणी लेखापरीक्षण कशासाठी?

एखाद्या संस्थेचे लेखापरीक्षण झाले असेल आणि यामध्ये काही त्रुटी राहिल्या असतील किंवा अहवालातील लेख्यांचे खरे व अचूक लेखापरीक्षण झाले नसेल, तर ही बाब निबंधकांच्या निदर्शनास आणून दिल्यास पुन्हा लेखापरीक्षण करण्याची तरतूद सहकार कायद्यात आहे. या चाचणी लेखापरीक्षेत निबंधक सूचित करतील, अशा बाबींच्या तपासणीचा समावेश असेल. सहकार कायद्यातील तरतुदीनुसार हा आदेश देण्यात आला असून, आता 2021-22 चे ‘गोकुळ’चे लेखापरीक्षण पुन्हा होणार आहे. तपासणीनंतर अहवाल सादर केला जाणार आहे.

Back to top button