आगामी निवडणुकांच्या तयारीला लागा : चंद्रकांत पाटील | पुढारी

आगामी निवडणुकांच्या तयारीला लागा : चंद्रकांत पाटील

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : भारतीय जनता पक्ष आणि बाळासाहेबांची शिवसेना यांचे संयुक्त सरकार ग्रामविकासाचा रथ जोमाने पुढे नेईल. नूतन सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्यांनी गावच्या विकासासाठी कष्ट घ्यावेत. आगामी निवडणुकीच्या तयारीला आतापासूनच लागा, असे आवाहन उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी रविवारी येथे केले.

जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाच्या नूतन सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांच्या सत्कारप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे होते. महासैनिक दरबार हॉलमध्ये कार्यक्रम झाला.

जिल्ह्यात भाजपचे 121 सरपंच आणि एक हजाराहून अधिक ग्रामपंचायत सदस्य विजयी झाले आहेत. विकास कामासाठी नूतन सदस्यांना निधी कमी पडणार नाही याची दक्षता घेऊ. पुण्यातही जिल्हा बँकेपासून ग्रामपंचायतीपर्यंत सर्वत्र विजय मिळवून जल्लोष साजरा केला आहे. महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांत भाजपचा झेंडा फडकविण्यासाठी तयारीला लागा, असेही मंत्री पाटील म्हणाले.

माजी आमदार सुरेश हाळवणकर म्हणाले, जिल्ह्यात पूर्वी एखादा सरपंच निवडून आला तरी सर्वांना आनंद व्हायचा. सरपंच, सदस्यांमध्ये भाजप नंबर वन आहे. महापालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीत भाजप प्रथम क्रमांकावरच राहील, याचा विश्वास वाटतो.

समरजितसिंह घाटगे म्हणाले, बाळासाहेबांची शिवसेना, रिपब्लिकन पार्टी, ताराराणी आघाडी, जनसुराज्य पक्ष अशा भाजपच्या मित्र पक्षांनी 250 पेक्षा अधिक ग्रामपंचायतींत सत्ता प्राप्त केल्याने भविष्यात जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत जनाधार स्पष्ट झाला आहे.

यावेळी मंत्री पाटील, सुरेश हाळवणकर, समरजितसिंह घाटगे यांच्या हस्ते 121 सरपंच, 114 उपसरपंच, तर 972 ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार केला.

कार्यक्रमास माजी मंत्री भरमूअण्णा पाटील, शिवाजीराव पाटील, अशोकराव माने, महानगर जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, बाबासाहेब हिंदुराव पाटील, के. एस. चौगले, मनोहर काटकर, राजाराम शिपुगडे यांच्यासह जिल्ह्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुनील मगदूम यांनी स्वागत केले. नाथाजी पाटील यांनी प्रास्ताविक केले. विठ्ठल पाटील यांनी आभार मानले.

Back to top button