देशात स्टेरॉईडच्या जादा वापरामुळे म्युकर मायकोसिसचा संसर्ग वाढला! | पुढारी

देशात स्टेरॉईडच्या जादा वापरामुळे म्युकर मायकोसिसचा संसर्ग वाढला!

कोल्हापूर; विशेष प्रतिनिधी :  कोरोना काळात भारतामध्ये म्युकर मायकोसिस (काळी बुरशी) या रोगाने बाधित रुग्णसंख्येचा आलेख वाढण्यामध्ये उपचारादरम्यान केलेला संप्रेरकांचा (स्टेरॉईडस्) अतिरिक्त वापर हे एक प्रमुख कारण असल्याचे मत साथरोगाच्या क्षेत्रात विशेषज्ज्ञ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डॉ. तनू सिंघल यांनी व्यक्त केले आहे.

नागपूर येथे आयोजित इंडियन सायन्स काँग्रेस या परिषदेमध्ये बोलताना मुंबईच्या कोकिलाबेन धीरूभाई अंबांनी हॉस्पिटलमधील प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ. सिंघल बोलत होत्या. त्या म्हणाल्या, भारतामध्ये कोरोना काळात मे २०२१ पर्यंत म्युकर मायकोसिसचे सुमारे ५० हजार रुग्ण आढळून आले. अमेरिकेच्या रोगनियंत्रण आणि प्रतिबंधक संस्थेच्या ( सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन) या संस्थेच्या मते म्युकर मायकोसिस वा काळी बुरशी हा आजार गंभीर आहे. परंतु, तो दुर्मीळ मानला जातो. विशेषतः ज्या रुग्णाची रोगप्रतिकारशक्ती कमी आहे, अशांना त्याचा संसर्ग होतो. प्रत्यक्षात भारतात कोरोना काळात उपचारांदरम्यान स्टेरॉईडचा वारेमाप वापर केला गेला. यामुळे ही रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात दिसून आली.

म्युकर मायकोसिसच्या आजारामुळे बुरशीचा प्रादुर्भाव प्रामुख्याने नाकाच्या आतील पटलाला (सायनस) वा फुफ्फुसाला होतो. हवेतून त्याचे विषाणू मानवी शरीरात प्रवेश करतात आणि कमी रोगप्रतिकारशक्ती असलेल्या व्यक्तींमध्ये हा आजार बघता बघता वाढतो. कोरोना काळातील म्युकर मायकोसिससंदर्भात जे अहवाल प्रसिद्ध झाले आहेत, यामध्ये महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये म्युकर मायकोसिसचे सर्वाधिक रुग्ण होते, जेथे हा वापर मोठ्या प्रमाणात झाला, असेही त्यांनी स्पष्ट केले.
म्युकर मायकोसिससाठी हवेतील पर्यावरण हा आणखी एक महत्त्वाचा घटक आहे. जेथे सार्वजनिक कचरा कुजतो, अशा दमट आणि पावसाळी वातावरणात काळ्या बुरशीच्या विषाणूंचा प्रसार वेगाने होतो, असे त्यांनी स्पष्ट केले.

या गोष्टी नव्हत्या कारणीभूत

कोरोनाकाळात ज्या रुग्णांची प्रतिकारशक्ती कमी होती आणि मधुमेहासारखे आजार ज्यांना जडले होते, अशा रुग्णांना स्टेरॉईडची अधिक मात्रा उपचारांदरम्यान देण्यात आली. रक्तातील अनियंत्रित साखरेची पातळी काळ्या बुरशीच्या विषाणूंचा सामना करू न शकल्याने म्युकर मायकोसिसचा संसर्ग वाढत गेला. ऑक्सिजन सिलिंडरचा वापर, मास्क, हवेतील आर्द्रता कमी करणाऱ्या उपकरणातील पाणी आणि गायीच्या शेणकुटांचे ज्वलन या गोष्टी म्युकर मायकोसिसचा संसर्ग वाढविण्यास कारणीभूत नव्हत्या, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

Back to top button