भारतात दर 10 व्यक्तींमागे एकाला कर्करोगाचा धोका | पुढारी

भारतात दर 10 व्यक्तींमागे एकाला कर्करोगाचा धोका

कोल्हापूर, राजेंद्र जोशी : प्रदूषणाची वाढती पातळी, बदलती जीवनशैली यामुळे भारतीयांचे आरोग्य दिवसेंदिवस चिंताजनक वळणावर ढकलले जाते आहे. नुकत्याच करण्यात आलेल्या एका अभ्यासामध्ये भारतातील प्रत्येक 10 व्यक्तींमागे एका व्यक्तीला त्याच्या जीवनप्रवासात कर्करोगाची बाधा होण्याची जोखीम असल्याचा निष्कर्ष पुढे आला आहे.

कर्करोगाच्या चढत्या आलेखाचा कल पाहता 2022 अखेरीस वर्षभरात 14 लाख 60 हजार नागरिकांना कर्करोगाने ग्रासले जाईल, असे या विषयीच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. भारतीय आयुर्विज्ञान संशोधन संस्था (आयसीएमआर) आणि नॅशनल सेंटर फॉर डिसिज इन्फॉर्मेटिक्स अँड रिसर्च (एनसीडीआयआर) या दोन राष्ट्रीय संस्थांच्या वतीने हा अभ्यास करण्यात आला. इंडियन जर्नल ऑफ मेडिकल रिसर्च या नियतकालिकामध्ये हा अभ्यासात्मक अहवाल प्रसिद्ध झाला आहे. यामध्ये प्रत्येक 67 नागरिकांमागे एका व्यक्तीला फुफ्फुसाच्या कर्करोगाची बाधा, तर प्रत्येक 29 महिलांमागे एका महिलेला स्तनाचा कर्करोग होण्याची जोखीम अधोरेखित होते आहे, असे या अहवालात नमूद केले आहे.

खबरदारी घेणे सर्वात महत्त्वाचे

केंद्र सरकारच्या अंगिकृत असलेल्या आरोग्य विज्ञानाच्या क्षेत्रातील राष्ट्रीय स्तरावरील या दोन मान्यवर संस्थांनी केलेला हा अभ्यास सांख्यिकी विश्लेषणाच्या स्वरूपाचा आहे. देशात कर्करोगाची बाधा होणारे नवे रुग्ण आणि लोकसंख्येतील रोगाची बाधा होण्याची जोखीम असलेले नागरिक यांच्या तुलनात्मक अभ्यासातून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. या अभ्यासामध्येच संबंधित रोगाविषयी खबरदारी घेतली आणि योग्य वेळी निदान केले, तर ही स्थिती बदलू शकेल, असेही स्पष्ट केले आहे.

Back to top button